निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणातून पारदर्शकता, विश्वासार्हता अधोरेखित- एन चंद्राबाबू नायडू

भारताच्या लोकशाही व्यवस्थेबाबत किंवा निवडणूक प्रक्रियेबाबत देश-विदेशात अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करणे, केवळ अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी अशा मुद्द्यांचा वापर करणे, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणातून पारदर्शकता, विश्वासार्हता अधोरेखित- एन चंद्राबाबू नायडू
n chandrababu naidu
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 10:08 PM

Election Commission : भारतीय निवडणूक आयोगाचा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कॉकरोच जनता पार्टी तसेच विरोधकांकडून त्यांचा राजीनामा मागितला जातोय. निवडणूक आयोगात फूट पडली आहे. आपले मत विचारात न घेताच ज्ञानेश कुमार यांनी अनेक निर्णय घेतले असी तक्रार तीन सदस्यीय निवडणूक आयोगातील सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी कॅबिनेट सचिवांकडे केली होती. त्यानंतर आता एसआयआर प्रक्रिया, मतदान यंत्रे याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. याच वादावर पडदा पाडण्यासाठी तिन्ही निवडणूक आयुक्तांनी आज (27 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. तसेच आमच्यात कोणताही वाद नाही, एकमतानेच आम्ही निर्णय घेतले, असे या तिन्ही निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे. दरम्यान, आता यावरच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी याच प्रकरणावर त्यांची भूमिका मांडली आहे. निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आयोगाची विश्वासार्हता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता दिसून येते असे ते म्हणाले आहेत.

चंद्राबाबू नायडू यांच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच निवडणूक आयुक्त एस. एस. संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने एकमताने जारी केलेल्या स्पष्टीकरणातून घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता अधोरेखित करण्यात आली आहे. या स्पष्टीकरणामुळे आयोगाच्या कामकाजाबाबत निर्माण झालेल्या विविध गैरसमजांना पूर्णविराम मिळालाय. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाबाबत (Special Intensive Revision – SIR) घेतले जाणारे निर्णय हे सामूहिक पद्धतीने आणि निश्चित संस्थात्मक नियमांचे पालन करूनच घेतले जात असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे, असे मत एन चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केले.

हे खूपच दुर्दैवी

तसेच, भारताच्या लोकशाही व्यवस्थेबाबत किंवा निवडणूक प्रक्रियेबाबत देश-विदेशात अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करणे, केवळ अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी अशा मुद्द्यांचा वापर करणे, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीचा निकाल हा जनतेच्या कौलाचे प्रतिबिंब असतो. सक्षम लोकशाही व्यवस्थेत विजय स्वीकारण्याइतकेच पराभवही संयमाने आणि नम्रतेने स्वीकारणे हे नेतृत्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते, अशी भूमिका त्यांनी मांडली.

घटनात्मक संस्थांचा आदर आणि त्यांच्यावरील जनतेचा विश्वास कायम ठेवणे ही सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची सामूहिक जबाबदारी आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरील जनविश्वास मजबूत ठेवण्यासाठी सर्वांनी संस्थात्मक व्यवस्थेचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us