
मुघल बादशाह औरंगजेबाला संपूर्ण भारतात केवळ एकच माणसाने आणि एकाच विचाराने अस्वस्थ केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या विचाराने त्याच्या सुखी जीवनाला सुरूंग लागला. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या निकाराच्या लढ्याने त्याची आत्मा सुद्धा थरथरली. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्याने त्याचा उरला सुरला आत्मविश्वास गळून पडला. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात 120 हून अधिक युद्ध केली. त्यामध्ये ते विजयी राहिले. संभाजी राजांनी औरंगजेबाची मुलगी जिनत हिला एक पत्र पाठवले होते. त्या पत्राचे मुघल दरबारात वाचन झाले होते. औरंगजेबाने दख्खनमधून निघून जावे नाहीतर कबरीसाठी जागा शोधावी असा इशारा राज्यांनी दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांचे भाकीत पुढे खरं ठरले.
मुलानेच केली बंडखोरी
औरंगजेबाचा चौथा आणि लाडका मुलगा मोहम्मद अकबर द्वितीय याने बापाविरोधातच बंडखोरी केली होती. राजपूत राजांनी त्याला साथ दिली. राजा राणा राज सिंह आणि दुर्गादास राठोर यांनी अकबराला सैन्य आणि आर्थिक रसद देण्याचे आश्वासन दिले. ही घटना 1681मधील होती. अकबराने स्वतःला बादशाह म्हणून घोषित केल्याने औरंगजेब संतापला होता. मग कुरापती आणि पाताळयंत्री औरंगजेबाने मुलाविरोधातच एक चाल खेळली. त्याने अकबराला एक पत्र लिहिले. त्यात त्याने राजपूत राजांच्या भुलथापांना बळी न पडता, त्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन केले. अकबर हा आपला लाडका मुलगा असल्याचे सांगायला औरंगजेब विसरला नाही. त्याचवेळी त्याने असे पत्र अकबराला मिळाल्याचे वृत्त राजपूत राजांपर्यंत पोहचवण्याची पण व्यवस्था केली. त्यामुळे राजपूत राजांनी अकबराला साथ न देण्याचे जाहीर केले.
संभाजी महाराजांनी दिली साथ
आता आपला मृत्यू जवळ आल्याचे अकबर द्वितीय याच्या लक्षात आले. अशा परिस्थितीत छत्रपती संभाजी महाराज हेच आपल्याला वाचवू शकतात म्हणून तो दक्षिणेत आले. त्याने महाराजांकडे आश्रय मागितला. त्याच्या सोबत बंडखोरांचे सैन्य सुद्धा होते. ही बाब समजताच औरंगजेबाचे सैन्य दक्षिणेवर चाल करून आला. त्याने बंडखोरांचे बंड मोडून काढले. तर औरंगजेबाने दक्षिणेत छावणी टाकण्याचे फर्मान काढले. त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मुलगी जिनत हिला हे पत्र लिहिले होते.
दरबारात पत्राचे वाचन
“औरंगजेब बादशाह हा काही मुसलमानांचा बादशाह नाही. हिंदुस्थानातील जनता विविध धर्मांचे पालन करते. ज्या इच्छेने औरंगजेबाने दख्खनमध्ये चाल केली, त्याची इच्छा, मनीषा आता पूर्ण झाली आहे. आता त्यांनी पुन्हा दिल्लीकडे परतायला हवे. एकदा आम्ही आणि आमचे पिताश्री त्यांच्या तावडीतून शिताफीने सुटलो आहोत. पण औरंगजेबाने जर असाच हेकेखोरपणा कायम ठेवला तर ते आमच्या कब्जातून सुटणार नाहीत. ते दिल्लीला कधीच परत जाऊ शकणार नाहीत. जर त्यांची हीच इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या कबरीसाठी जागा शोधून ठेवावी.” असा या पत्राचा सार आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा करारीपणा आणि औरंगजेबाला दिलेली ताकीद स्पष्ट दिसते.
27 वर्षे दक्षिणेत तोळ ठोकून सुद्धा औरंगजेबाला त्याचे इप्सित साध्य करता आले नाही. त्याला स्वराज्य मोडात आले नाही. स्वराज्य पुन्हा नव्या तेजाने लखलखले. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्याने मराठ्यांना नवे स्फूरण चढले. त्यांचे वारू पुन्हा उधळले. स्वराज्य संपले नाही. ते अटकेपार पसरले.