
भारतीय सुरक्षा दलाच्या गाडीला आयईडी बॉम्बने उडवून 8 जवांना शहीद करणाऱ्या राक्षसी नक्षलवाद्यांचा आज तितक्याच तीव्रतेने बदला घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज छत्तीसगडच्या बीजापुरात सर्च ऑपरेशन जारी करत एका-एका नक्षलवाद्याला बिळातून बाहेर काढत त्यांचा खात्मा केला आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी आज दिवसभरात तब्बल 10 नक्षलवाद्यांचं एनकाउंटर केलं आहे. जवानांकडून अजूनही परिसरात ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे. या ऑपरेशनमधून कोणकोणत्या खतरनाक नक्षलवाद्याचा खात्मा झाला, याबाबतची माहिती आता लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडच्या बीजापूर येथे मोठ्या घातपाताची घटना घडली होती. नक्षलवाद्यांनी कुटरु परिसरात भर जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांच्या गाडीवर हल्ला केला होता. नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणत जवानांच्या गाडीला उडवलं होतं. या हल्ल्यात तब्बल 8 जवान शहीद झाले होते. तसेच एका ड्रायव्हरचादेखील मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. अखेर भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या घटनेनंतर अवघ्या 10 दिवसांत बदला घेतला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी आज 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
छत्तीसगढच्या बीजापूर येथे आज सकाळपासूनच सुरक्षाबल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचं मोठं यश पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना आलं आहे. स्थानिक पोलिसांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. बीजापूरमध्ये तेलंगणाच्या सीमेवर सुरक्षा दलाकडून मोठं ऑपरेशन सुरु आहे. या दरम्यान आज सकाळपासून सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये वारंवार फायरिंग सुरु होती.
पोलिसांना या चकमकीदरम्यान संबंधित परिसरातून एसएलआरसह अनेक हायटेक हत्यारं मिळाली आहेत. या ऑपरेशनमध्ये डीआरजी बीजापुर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोबरा 204, 205, 206, 208, 210 आणि केरिपु 229 बटालियन यांचा समावेश आहे. या सर्व बटालियनमधील जवान आक्रमकपणे नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करत असल्याची माहिती मिळत आहे. बीजापूरच्या मारुढबाका आणि पुजारी कांकेर परिसरात अजूनही जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.