Dyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या घराच्या भिंतीवर लिहिले ‘गद्दार’! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर मोठा राडा, Video व्हायरल
CEC Gyanesh Kumar House Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या आग्रा येथील निवासस्थानी मोठा राडा झाला. घराच्या गेटला काळे फासले आणि घराच्या भिंतीवर गद्दार असे लिहिल्याचा आरोप होत आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

CEC Gyanesh Kumar House Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. मतदार यादीतील विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) गदारोळ सुरू आहे. भाजपच्या फायद्यासाठीच मतदार याद्यांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. दरम्यान ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा येथील विजयनगर कॉलनीत मोठा राडा झाला आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी उग्र प्रदर्शन केले. आंदोलकांनी ज्ञानेश कुमार यांच्या घराच्या गेटला काळे फासले आणि घराच्या भिंतीवर गद्दार असे लिहिल्याचा आरोप होत आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आता हे कार्यकर्ते काँग्रेसचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. टीव्ही ९ मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
घराच्या भिंतीवर लिहिले गद्दार
ज्ञानेश कुमार यांच्या घराच्या भिंतीवर गद्दार असे लिहिण्यात आले. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिल यादव आणि मथुरा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश धनगर यांनी हे आंदोलन केल्याचे सांगितल्या जात आहे. आंदोलक सोमवारी सकाळी 11 वाजता हातात बॅनर्स घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करत निवासस्थानाबाहेर पोहचले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या घराच्या गेटला काळा रंग फासला. तर भिंतीवर गद्दार, वोट चोर असे लिहिले. हे आंदोलक काही काळ तिथे थांबून निघून गेले. निदर्शनावेळी तिथे कोणताही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. भिंतीवर लिहिलेले आणि गेटवरील काळा रंग पुसून टाकण्यात आला.
आंदोलकांची ओळख पटवण्याचे काम सुरू
या आंदोलनाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजच्या आधारे पोलीस आता आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर आग्रा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुभाष पार्क ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. अनिल यादव यांच्यासह इतर नेत्यांनी घोषणाबाजी केली आणि मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
In UP’s Agra, Congress workers spray painted “Vote Chor, Gaddar Gyanesh” on the main entrance of CEC Gyanesh Kumar’s residence in the city. pic.twitter.com/o1bo6DSOBQ
— Piyush Rai (@Benarasiyaa) September 28, 2026
सुरक्षा वाढवली, राजकीय वर्तुळात पडसाद
या घटनेनंतर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवासस्थानबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि निर्णयावरून कायदेशीर आणि राजकीय संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे आता आयुक्तांच्या घराबाहेर असा निषेध व्यक्त झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.