सुरक्षेच्या कॅम्पमध्येच गोळीबाराचा थरार! जवानानेच सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; 4 जणांचा मृत्यू, जम्मू काश्मीरमध्ये मोठी घटना
Jammu Kashmir CISF Camp Firing: जम्मू आणि काश्मीरमधील बसोहली येथे एका सीआयएसएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. सीआयएसएफ जवानांमध्ये झालेल्या वादानंतर ही घटना घडली.

जम्मू आणि काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कठुआ जिल्ह्यातील बसोली येथील सीआयएसएफ छावणीत एका जवानाने सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आले नाही आहे. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी सीआयएसएफ मुख्यालयाने चौकशी समितीचे आदेश दिले आहेत. सीआयएसएफचे महासंचालक संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. ही घटना नेमकी कशी घडली याचा घटनाक्रम समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा परिसर हिमाचल प्रदेशच्या सीमेजवळ, चंबा जिल्ह्याला लागून आहे. ही घटना सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडली आहे. या घटनेकडे आपापसातील वादातून हत्या झाल्याचे पाहिले जात होते. मात्र गोळीबारामागील हेतू आणि घटनेमागील परिस्थिती अद्याप कळलेली नाही. कठुआ जिल्हा पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. मृत झालेल्या चौघांमध्ये असिस्टंट कमांडंट दर्जाच्या सीआयएसएफ अधिकाऱ्याचा समावेश आहे.
सीआयएसएफ मुख्यालयाने या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. डीजीसीआयएसएफ संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे. कठुआ पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली आहे. सीआयएसएफ जवानांमध्ये झालेल्या वादानंतर आरोपीने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संसदेच्या ५० व्या कायद्यानुसार १९६८ मध्ये स्थापन झालेले सीआयएसएफ आज गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक बहुआयामी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणून कार्यरत आहे. केवळ ३,१२९ जवानांपासून सुरुवात करून आज हे दल २,२०,००० जवानांपर्यंत वाढले आहे. देशातील जवळजवळ सर्व राज्यांमध्ये तैनात आहे.
सध्या, सीआयएसएफ देशातील ७० विमानतळांसह ३६१ महत्त्वाच्या राष्ट्रीय आस्थापनांना सुरक्षा पुरवते. याव्यतिरिक्त, कोणत्याही सुरक्षाविषयक आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी या दलाकडे १२ राखीव बटालियन आहेत आणि ते देशभरात आठ अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था चालवते, ज्या ‘भविष्यातील दलाला’ सातत्याने तयार करून मजबूत करतात.