
ED raid : ईडीच्या धाडीने वाढवल्या मुख्यमंत्र्यांची चिंता, पत्नीकडे सोपवणार राज्याची कमान? झारखंडच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. अवैध खाणकाम प्रकरणी ईडीचे पथक रांची, साहिबगंज आणि देवघरसह अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यापर्यंत ही चौकशी येऊ शकते. ईडी त्यांचे मीडिया सल्लागार अभिषेक प्रसाद, साहिबगंजचे जिल्हाधिकारी रामनिवास यादव आणि देवघरचे माजी आमदार पप्पू यादव, आर्किटेक्ट बिनोद सिंह आणि कंत्राटदार सरावगी यांच्यावरही कारवाई करत आहे. त्यामुळे आता हेमंत सोरेन राजीनामा देण्याची शक्यता आहे.
हेमंत सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे कमान सोपवू शकतात, अशी बातमी आहे. रांची सीएम हाऊसमध्ये पक्षाच्या विधीमंडळाची बैठक सुरू आहे. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार उपस्थित आहेत. या बैठकीत सोरेन यांनी आपल्या पक्षाव्यतिरिक्त काँग्रेस आणि आरजेडीच्या आमदारांनाही बोलावले होते. ईडीने हेमंत सोरेन यांना सातव्यांदा समन्स पाठवले आहे, त्यानंतर ते राजीनामा देऊन राज्याची कमान पत्नीकडे सोपवू शकतात असे बोलले जात आहे.
या बैठकीला पक्षाचे २१ आमदार आणि काँग्रेसचे १२ आमदार उपस्थित आहेत. आतापर्यंत एकूण 33 आमदार बैठकीला पोहोचले आहेत. महाआघाडीच्या एकूण आमदारांची संख्या सध्या ४८ आहे.
बेकायदेशीर खाण प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी इडीने छापे टाकले आहेत. हेमंत सोरेन यांनी आतापर्यंत ईडीच्या 7 समन्सकडे दुर्लक्ष केले आहे आणि आता ईडीच्या तत्पर कारवाईमुळे त्यांच्या चिंता वाढल्या आहेत.