Railway History : मुंबईची चार रेल्वे स्थानके का बंद झाली ? कोणती होती ही स्थानके? ती कुठे होती? जाणून घ्या इतिहास

| Updated on: Apr 12, 2024 | 2:16 PM

मुंबईची जीवनवाहीनी लोकल ट्रेन दररोज मुंबईकर चाकरमान्यांना स्वस्तात घर ते कार्यालय असा प्रवास घडवित असते. परंतू मुंबईचा इतिहास पाहिला तर बोरीबंदर ( मुंबई ) ते ठाणे ही देशातीलच नव्हे तर आशियातील पहिली ट्रेन धावली त्याला येत्या 16 एप्रिलला 171 वर्षे पूर्ण होणार आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानके नेहमीच गजबजलेली असतात. मात्र, मुंबईतील काही स्थानके काळाच्या ओघात बंद झाली. ती स्थानके कोणती होती, हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Railway History : मुंबईची चार रेल्वे स्थानके का बंद झाली ? कोणती होती ही स्थानके? ती कुठे होती? जाणून घ्या इतिहास
why four railway stations disappeared in mumbai
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

बोरीबंदर स्थानक ते ठाणे दरम्यान आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली होती. येत्या 16 एप्रिलला या घटनेला तब्बल 171 वर्षे पूर्ण होतील. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अनेक स्थानके कालानुरुप अस्तित्वात आली तर काही स्थानके काळाच्या उदरात गडप झालीत. मुंबईत ब्रिटीशकाळात कार्यरत असलेली चार स्थानके आज अस्तित्वात नाहीत. या स्थानकांचा इतिहास मोठा रंजक आहे. या स्थानकांची गरज का संपली? त्या स्थानकांची नावे काय होती? ती कुठे होती? त्यांचा नेमका काय इतिहास आहे हे पाहूया ?

ब्रिटीशांच्या काळात मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे अशी आशियातील पहिली ट्रेन 16 एप्रिल 1853 साली धावली होती. त्या काळात कापडाचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालायचा. त्यामुळे ब्रिटीशांना मुंबई बंदरात कापसाची वाहतूक करण्यासाठी रेल्वे मार्ग बांधायला सुरुवात केली. मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे मार्गावर शनिवार 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे धावली. GIPR म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीने (आत्ताची मध्य रेल्वे) आशियामध्ये ही पहिलीच प्रवासी रेल्वे सुरु केली होती. त्यानंतर काही वर्षांनी ज्याला आपण आज पश्चिम रेल्वे म्हणतो तो मार्ग बॉम्बे बडोदा ॲण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे कंपनीने बांधला. मुंबई (बोरीबंदर) ते ठाणे या मार्गावर काही रेल्वे स्थानकांची उभारणी त्या काळात झाली होती. मात्र, ब्रिटीश काळातील चार स्थानके आज अस्तित्वात नाहीत. कोणती आहेत ही स्थानके? ही स्थानके का बंद करण्यात आली? ही स्थानके कोठे होती, सर्व काही जाणून घेऊया…

कापसाच्या निर्यातीसाठी रेल्वे सुरु

शनिवार 16 एप्रिल 1853 या मुहूर्तावर वाफेच्या तीन इंजिनाच्या सहाय्याने 14 डब्बे घेऊन आणि तीन इंजिनाच्या सहाय्याने देशातीलच नव्हे तर आशियातील पहिली रेल्वे आगीनगाडी बोरीबंदर ( मुंबई सीएसएमटी ) ते ठाणे मार्गावर धावली. या घटनेस उणीपुरी 171 वर्षे झालीत. परंतु, तिच्या पावलावर पाऊल ठेवून ‘बीबी अ‍ॅण्ड सीआय’ ( बॉम्बे बडोदा ) म्हणजे आताची पश्चिम रेल्वेदेखील कापसाच्या वाहतूक करण्यासाठीच सुरु झाली. 28 नोव्हेंबर 1864 साली ही पश्चिम रेल्वेची पहिली रेल्वे बडोदा ते ग्रँटरोड टर्मिनल ( त्या काळात ग्रॅंटरोड हे टर्मिनल होते ) या मार्गावर धावल्याचे म्हटले जाते.

आधी ग्रॅंटरोड मुख्य टर्मिनल होते

28 नोव्हेंबर 1864 साली मुंबईत ‘बीबी अ‍ॅण्ड सीआय’ ( बॉम्बे बडोदा ) कंपनीची पहिली रेल्वे बडोदा ते ग्रँटरोड टर्मिनल अशी धावली. गुजरातमध्ये पिकणाऱ्या कापसाची निर्यात मुंबईत करण्यासाठी ब्रिटीशांनी खरे तर मुंबईला जाणारे रेल्वेमार्ग बांधण्याचे ठरविले. मुंबई बंदरातून कापूस निर्यात चांगली होऊ शकते हे ध्यानात घेऊन मुंबईहून सुरत मार्गे आगरा येथे जाणारा लोहमार्ग टाकण्याचे ठरले. 1856 च्या अखेर सूरतपासून रूळ टाकण्याचे काम सुरू झाले. वलसाडमार्गे मुंबईत ग्रँटरोडपर्यंत रूळ टाकून पूर्ण झाले. त्याकाळात ग्रँटरोड हेच मुख्य टर्मिनल होते. त्यानंतर मुंबई सेंट्रल हे टर्मिनलच्या रुपात उभे राहिले.

पश्चिम रेल्वे केव्हा अस्तित्वात आली ?

चर्नीरोड ते थेट कुलाब्यापर्यंतची बहुतांशी जमीन ही समुद्राखाली होती. तत्कालीन मुंबई इम्पु्रव्हमेंट ट्रस्टने ‘बीबी अ‍ॅण्ड सीआय’ कंपनीला ग्रँटरोड ते चर्नीरोड आणि त्यापुढे रूळ टाकण्यास राजी केले. समुद्रात भराव टाकण्यासाठी मालाड आणि गोरेगाव येथे असलेले डोंगर खणण्यात आले. डोंगरातून निघालेले दगड, माती पुढे आणण्यात आली. अरबी समुद्रात त्याचा भराव घालून ‘रेक्लेमेंशन’ करण्यात आले. बडोदा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे ( BB & CI ), सौराष्ट्र, राजपुताना आणि जयपूर या संस्थानातील रेल्वेचे एकत्रीकरण करण्यात आले आणि यातूनच 5 नोव्हेंबर 1951 रोजी पश्चिम रेल्वे अस्तित्वात आली.

बॅक बे स्थानक कुठे होते ?

पश्चिम रेल्वेच्या मार्गावर बॅक बे नावाचे स्थानक होते हे अनेकांना माहिती नसेल. 1866 मध्ये ‘बॅक बे’ नावाच्या रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली होती. हे स्थानक आजच्या मरीनलाईन्स रेल्वे स्थानकाजवळ होते. पश्चिम रेल्वेची पहिली उपनगरीय लोकल सेवा विरार आणि बॅक बे या स्थानकांदरम्यान 12 एप्रिल 1876 रोजी सुरू झाली. पहिली उपनगरीय लोकल विरार स्थानकातून रोज सकाळी 6.45 वा सुटायची तर परतीची लोकल बॅकबेहून संध्याकाळी 5.30 वाजता सुटायची. अशा सुरुवातीला केवळ दोनच फेऱ्या चालविल्या जायच्या. त्यानंतर हळूहळू उपनगरात लोकसंख्या वाढल्याने त्याच्या पाच फेऱ्या झाल्या. त्यानंतर 10 जानेवारी 1870 रोजी बॅकबे ते चर्चगेट असा लोकल सेवेचा विस्तार झाला. त्यानंतर बॅके बे स्थानकाची आवश्यकता उरली नसल्याने ते बंद करण्यात आले.

कुलाबा रेल्वे स्थानकाचा इतिहास…

इंग्रजांच्या वस्त्या कुलाबा परिसरात असल्याने सुरूवातीस समुद्रात भराव टाकून तीन प्लॅटफॉर्म असलेले कुलाबा स्थानक बांधण्यात आले. 7 एप्रिल 1896 रोजी सुरू झालेले कुलाबा स्थानकही नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला. लांबपल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या सोडण्यासाठी मुंबई सेंट्रलमध्ये मेनलाईन टर्मिनलची स्थापन करण्यात आली. त्यामुळे जानेवारी 1931 मध्ये कुलाबा स्थानक बंद केले गेले. त्यानंतर उपनगरी लोकल सेवांसाठी चर्चगेट स्थानक टर्मिनलच्या स्वरूपात उदयास आले. 1867 मध्ये केवळ 6 फेऱ्या चालविणारी पश्चिम उपनगरीय रेल्वे आता आपल्या तब्बल 1394 फेऱ्यांद्वारे 36 लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करत आहे.

Frontier mail leaving ballard pier railway station

मुंबई पोर्ट ट्रस्टचे बेलार्ड पिअर मोल स्टेशन

फोर्ट परिसरामध्ये बेलार्ड इस्टेट आणि बेलार्ड पिअर हा परिसर सुंदर हेरिटेज इमारतींनी नटलेला आहे. येथे अॅलेक्झांड्रा डॉक आहे. ब्रिटीशकाळात येथे लंडन तसेच परदेशातून बोटी येऊन येथे नांगर टाकत असत. या ठिकाणी ब्रिटीशांच्या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत बेलार्ड पिअर (मोल स्टेशन) स्थानक होते. या मोल स्टेशनमधून फाळणीच्या आधी थेट पाकिस्तानच्या पेशावर म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत फ्रंटियर मेल धावत असत. स्वातंत्र्यानंतर पंजाबच्या अमृतसरपर्यंत फ्रंटियर मेल सीमित करण्यात आली. आता त्याच ट्रेनचे नाव नंतर गोल्डन टेम्पल (सुवर्ण मंदिर) ठेवण्यात आले आहे. हे ब्रिटीशकालीन बेलार्ड पिअर ( मोल स्टेशन ) स्थानक नंतर बंद करण्यात आले. त्यानंतर कुलाबा स्थानकातून फ्रंटिअर मेल सुटायची असे सांगितले जाते.

एसीसाठी चक्क बर्फाच्या लाद्या…

पश्चिम रेल्वेने 150 तिच्या वर्षप्रतीपूर्तीनिमित्त एक कॉफी टेबल बुक प्रकाशित केले होते. त्यात फ्रंटियर मेलचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. या छायाचित्रात ‘फ्रंटियर मेल’मध्ये बर्फाच्या लाद्या तोडून त्याचे तुकडे भरण्यासाठी डब्यांवर उभे राहिलेले कामगार दिसत आहेत. फ्रंटियर मेलला त्या काळात वातानुकूलित करण्यासाठी कुल्फीच्या भांड्यात जसा बर्फ भरतात तसा ट्रेनच्या डब्यात थंडावा निर्माण करण्यासाठी ट्रेनच्या डब्यावर उभे राहून बर्फ भरला जात असे. आज आधुनिक वातानुकुलित यंत्रणेत आरामात थंडगार हवेत काम करणाऱ्या पिढीला त्याकाळातला थंडावा निर्माण होण्यासाठी करावा लागणारा हा द्राविडी प्राणायम पाहून आश्चर्य वाटेल.

frontier mail ice block load

बेलार्ड पिअर मोल स्टेशनचा इतिहास

बेलार्ड पिअर परिसरात त्याकाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत असलेल्या बेलार्ड पिअर मोल स्टेशनातून पाकिस्तानातील पेशावर जाणाऱ्या फ्रंटियर मेलमधून स्वातंत्र्यपूर्व काळात सुभाषचंद्र बोस यांनी 1944 साली पेशावरला जाऊन अफगाणिस्तान गाठले होते. तर, अभिनेता पृथ्वीराज कपूर यांनीदेखील पाकिस्तानातील आपल्या गावी जाण्यासाठी या ट्रेनने प्रवास केल्याचे म्हटले जाते. पंजाब मेल देखील बेलार्ड पिअरच्या मोल स्टेशनवरुन पेशावरला जायची. ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेच्या ( GIPR ) पंजाब मेलला टक्कर देण्यासाठी बॉम्बे, बडोदा आणि सेंट्रल इंडिया रेल्वे ( BB & CI ) कंपनीने फ्रंटियर मेलची सुरुवात केली होती.

फ्रंटियर मेलपेक्षा पंजाब मेल जुनी

फ्रंटियर मेलपेक्षा पंजाब मेल 16 वर्षे जुनी असल्याचे म्हटले जाते. मुंबईहून पेशावरला जाणारी पंजाब मेल नेमकी केव्हा सुरु झाली याविषयी स्पष्टता नाही. परंतु, 1911 च्या कागदपत्रे तसेच 12 ऑक्टोबर 1912 रोजी दिल्ली स्थानकात पंजाब मेल लेट झाल्यानंतर प्रवाशांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पंबाज मेलने आपला पहिला प्रवास बेलार्ड पिअरच्या मोल स्थानकातून 1 जून 1912 पासून सुरु केल्याचे म्हटले जाते. आज बेलार्ड पिअर स्थानक अस्तित्वात नाही. येथे आता ॲलेक्झांड्रा डॉकमध्ये इंटरनॅशनल क्रुझसाठी बंदर तयार करण्यात आले आहे.

पहिली वातानुकुलित ट्रेन

फ्रंटियर मेलची खासियत म्हणजे या ट्रेनच्या काही डब्यात वातानुकूलित सुविधा होती. त्यासाठी ट्रेनच्या बोगीत गरम होऊ नये म्हणून बर्फ ठेवून पंख्यांच्या सहाय्याने थंड हवा पसरवली जायची. हा बर्फ वितळला कि पुन्हा दुसऱ्या स्थानकात वितळलेल्या पाण्याचा निचरा करून बॉक्समध्ये नव्या बर्फाच्या लाद्या भरल्या जायच्या. 1934 मध्ये बोगीत थंडावा निर्माण करण्यासाठी बर्फाच्या लाद्या लावणे सुरु केले. त्यामुळे ही भारतातील पहिली एसी बोगी असलेली ट्रेन बनली. फ्रंटियर मेल 2335 किलोमीटर लांबीचा प्रवास 72 तासांत पूर्ण करायची. या ट्रेनचे एक वैशिष्ट्ये होते की ही ट्रेन कधीच लेट व्हायची नाही. नेहमी वेळेवर धावण्यासाठी ती प्रसिद्ध होती.

संदर्भ : ‘हाल्ट स्टेशन इंडिया : दि ड्रामॅटिक टेल ऑफ दि नेशन्स फर्स्ट रेल लाईन्स’, लेखक : राजेंद्र आकलेकर