दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांना प्रवेशासाठी कोरोना अहवाल सक्तीचा

| Updated on: Feb 24, 2021 | 11:14 AM

देशातील 11 राज्यांमध्ये मंगळवारी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 6,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. | Coronavirus Delhi

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांना प्रवेशासाठी कोरोना अहवाल सक्तीचा
देशातील 11 राज्यांमध्ये मंगळवारी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 6,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
Follow us on

दिल्ली: देशातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा उसळी घेतल्यानंतर आता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, केरळ आणि पंजाबमधील नागरिकांना कोरोना नेगेटिव्ह अहवाल असेल तरच दिल्लीत प्रवेश मिळेल. दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी या पाच राज्यांतील नागरिकांना RT-PCR अहवाल सादर करावा लागेल. 27 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून 15 मार्चपर्यंत तो लागू राहील. (Negative covid report to be mandatory for arrivals from these 5 states)

गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. देशातील 11 राज्यांमध्ये मंगळवारी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 6,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती आणि नागपूरमध्ये कोरोना प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे.

तर दुसरीकडे गुजरातच्या 4 जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. यामध्ये अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोटचा समावेश आहे. तर मध्य प्रदेशात इंदूर, भोपाळ आणि बेतूल या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रसाराचा वेग वाढला आहे. देशातील एकूण 122 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6 हजार नवे रुग्ण

राज्यात कोरोना संसर्गाने नव्याने डोके वर काढले आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. आजसुद्धा (23 फेब्रुवारी) कोरोनाग्रस्तांची संख्या हजारोंनी वाढली असून कालच्या तुलनेत आज 1000 नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. राज्यासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.

मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 6218 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच, 5869 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्क्यांवर आहे. तर दिवसभरात 51 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.45 टक्क्यांवर आहे. अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, तर आगामी काळात हा मृत्यूदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 12 हजार 312 वर पोहोचला आहे. काल राज्यात 5 हजार 210 कोरोनारुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या:

बुलडाण्यात एकाच गावातील 155 जणांना कोरोनाची लागण; धार्मिक कार्यक्रमातून संसर्ग?

मुंबईत लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का, रेल्वेचे अधिकारी म्हणतात..

(Negative covid report to be mandatory for arrivals from these 5 states)