अंतिम संस्काराचा व्हिडीओ पाठवून द्या… 5100 रुपये पाठवले, तिन्ही मुली निघाल्या निर्दयी; तडपून तडपून वडील गेले

अंतिम संस्काराचा व्हिडीओ पाठवून द्या असे म्हणत पाठवले 5100 रुपये. मृत्यूपूर्वी मुलींना बघण्याची इच्छा पण अचानक झाले निधन. पण अंतिम संस्काराला आल्या नाहीत तिन्ही मुली. कारण ऐकून व्हाल चकित.

अंतिम संस्काराचा व्हिडीओ पाठवून द्या... 5100 रुपये पाठवले, तिन्ही मुली निघाल्या निर्दयी; तडपून तडपून वडील गेले
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 06, 2026 | 4:28 PM

ज्या मुलींना लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी आयुष्यभर मेहनत घेतली, त्याच मुलींना वडिलांच्या अखेरच्या क्षणी भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. हरियाणातील सोनीपत येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून टाकले असून, वृद्ध पालकांचे वाढते एकाकीपण आणि बदलते कौटुंबिक संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सोनीपतच्या वेस्ट रामनगर परिसरातील एका वृद्धाश्रमात राहणारे 74 वर्षीय शिवचरण गुप्ता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. वृद्धाश्रम प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या सुमारे 20 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. याची माहिती वेळोवेळी त्यांच्या मुलींना देण्यात आली होती. मात्र, कोणतीही मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली नाही.

पत्नीच्या निधनानंतर वृद्धाश्रमात राहत होते

शिवचरण गुप्ता हे पूर्वी कपड्यांचे व्यापारी होते. पत्नीसोबत ते वृद्धाश्रमात राहायला आले होते. काही काळानंतर पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर ते एकटेच वृद्धाश्रमात राहत होते. आजारपणातही त्यांना आपल्या मुलींना शेवटचे एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती. मात्र ती इच्छा अपुरीच राहिली आणि मुलींची वाट पाहत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवचरण गुप्ता यांना मुलगा नव्हता. त्यांनी आपल्या तीनही मुलींचे प्रेमाने संगोपन केले. त्यांना चांगले शिक्षण दिले आणि स्वावलंबी बनवले. त्यापैकी दोन मुली शिक्षिका झाल्या. मात्र, वडिलांच्या निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने संपर्क साधला असता, मुलींनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याचे सांगितल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

व्हिडिओ कॉलवर पाहिला अंत्यसंस्कार

वृद्धाश्रम प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी स्वतः येण्याऐवजी अंत्यसंस्काराचा खर्च म्हणून 5,100 रुपये पाठवले आणि अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवण्याची विनंती केली. त्यामुळे शिवचरण गुप्ता यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या तिन्ही मुली अनुपस्थित राहिल्या. अंत्यसंस्काराची प्रक्रिया त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पाहिल्याचे सांगितले जात आहे.

कुटुंबातील कोणीही उपस्थित नसल्याने वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत शिवचरण गुप्ता यांची अंत्ययात्रा काढली. सर्व धार्मिक विधी पार पाडत त्यांनी मुलाचे कर्तव्य निभावले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

अस्थीही नेण्यास नकार

अंत्यसंस्कारानंतरही मुलींनी वडिलांच्या अस्थी घेण्यासाठी येणार नसल्याचे सांगितले. त्या गंगेत विसर्जित करण्याची विनंती त्यांनी वृद्धाश्रम प्रशासनाला केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवचरण गुप्ता यांच्या कुटुंबाच्या संमतीने त्यांच्या डोळ्यांचे दान करण्यात आले. त्यांच्या नेत्रदानामुळे आता एखाद्या गरजू व्यक्तीला दृष्टी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून मृत्यूनंतरही त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी कार्य केल्याची भावना व्यक्त होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us