स्वातंत्र्य दिनाच्या आधीच दिल्लीत मोठी खळबळ; एअरपोर्ट, हायकोर्टासह 6 ठिकाणी बॉम्बची धमकी

स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली हायकोर्ट, IGI विमानतळ आणि राजधानीतील सहा ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. बॉम्बशोधक पथके कसून तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या आधीच दिल्लीत मोठी खळबळ;  एअरपोर्ट, हायकोर्टासह 6 ठिकाणी बॉम्बची धमकी
delhi high court
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2026 | 2:07 PM

देशभरात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली हायकोर्टासह राजधानीतील सहा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. हायकोर्टाला मेलवरून ही धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मिळताच हायकोर्ट आणि परिसरात बॉम्ब विरोधी पथकाने धाव घेतली असून कसून तपासणी करण्यात येत आहे.

दिल्ली हायकोर्टच नव्हे तर जामनगर हाऊस, झंडेवालानची फ्लॅटेड इमारत, एमबी साकेत येथील डीएम कार्यालय, आयजीआय एअरपोर्टचं टर्मिनल-3 आणि दिल्ली कँटचं एसडीएम कार्यालयालाही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व ठिकाणी संबंधित सुरक्षा पथके आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. या सहाही ठिकाणची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही संदिग्ध वस्तू मिळालेली नाही.

कोर्ट परिसरात कसून तपासणी

दिल्ली हायकोर्टाला धमकीचा मेल आल्यानंतर रजिस्ट्रार जनरल दिल्ली पोलिसांच्या संपर्कातत आहेत. हायकोर्ट परिसरात बॉम्ब विरोधी पथक कसून तपास करत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. ज्या ज्या ठिकाणी धमकी आली होती, त्या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे.

पोलिसांकडून माहिती नाही

दरम्यान, पोलीस यंत्रणा धमकी आलेल्या ठिकाणी कसून तपास करत असल्याने नेमकं धमकीच्या मेलमध्ये का म्हटलंय? तपासात काही आढळलं की नाही? मेल कुणाकडून आला? मेल करणारा व्यक्ती पकडला गेला की नाही? याची माहिती अद्याप पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्येक मार्गावर अतिरिक्त तपासणी केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणीही सुरक्षा एजन्सी लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us