देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार… शिंदे सेनेच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट, राज्याची धुरा सांभाळणार कोण? हातासरशी टाकले सांगून
Chandrakant Raghuvanshi on Devendra Fadnavis: खासदार संजय राऊत हे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या सुरात इतरही विरोधक सूर मिसळत असताना आता थेट शिंदे सेनेच्या आमदारानेच ते दिल्लीत जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

जितेंद्र बैसाणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवासी होणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत सातत्याने करत आहेत. त्याचे खंडन ही भाजपकडून करण्यात आले आहे. दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच हा विषय खोडलेला आहे. पण महायुतीमधील काही नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वक्तव्याने महायुतीच रक्तबंबाळ झाली आहे. काल त्यांनी भाजप शिवसेनेमुळे जिवंत असल्याचा दावा केला. तर आता मुख्यमंत्री फडणवीस हे लवकरच दिल्लीत जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुती सुमने
नंदूरबार येथे माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुती सुमने उधळली. राज्याची धुरा पात्र आणि योग्यपणे सांभाळणार कोण असेल तर एकनाथ शिंदे आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी असा बॉम्ब फोडला.एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवणारे मुख्यमंत्री कोणी असतील तर एकनाथ शिंदे आहेत, असे कौतुकाचे मनोरेही त्यांनी बांधले.
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार
केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस जात असल्याची माहिती मिळत आहे, असा गौप्यस्फोटही रघुवंशी यांनी केला. केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस गेलेत, कारण महाराष्ट्राचे नेतृत्वसुद्धा केंद्रात पाहिजे आणि प्रसंगी केंद्रात देवेंद्र फडणवीस गेले तर मग राज्याची धुरा कोण सांभाळेल. तर त्यासाठी पात्र आणि योग्य एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली. आतापर्यंत विरोधी गोटातून फडणवीस दिल्लीत जाण्याची चर्चा सुरू होती. आता मित्र पक्षातूनही हाच दावा होत असल्याने दिल्ली अब दूर नही, असे सूर घुमू लागले आहे.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा परिचय
खानदेश, नंदुरबार जिल्ह्यात रघुवंशी कुटुंबिय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातच नाही तर विधी, कायदा क्षेत्रातही अग्रगण्य मानले जाते. स्थानिक सहकार, शिक्षण आणि विविध प्रकल्पांमध्ये या कुटुंबाचे मोठे योगदान आहे. सध्या चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेत आमदार म्हणून काम करत आहेत. अक्कलकुवा, शिरपूर यासह धुळे, नंदुरबार परिसरात त्यांचे काम आहे.
