Delhi Corona Update : दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत, मनीष सिसोदियांचं राजनाथ सिंहांना पत्र

| Updated on: May 03, 2021 | 2:24 PM

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई लढण्यासाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची मागणी केली आहे.

Delhi Corona Update : दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत, मनीष सिसोदियांचं राजनाथ सिंहांना पत्र
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं संरक्षणमंत्र्यांना पत्र
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई लढण्यासाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची मागणी केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना त्याबाबत एक पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात ऑक्सिजन आणि रुग्णालय उभारण्याची मागणी केलीय. (Delhi Deputy CM Manish Sisodia’s letter to Defense Minister Rajnath Singh)

‘राजधानी दिल्लीसाठी शक्य होईल तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले जावेत. त्याचबरोबर DRDO मध्ये ज्या प्रमाणे एका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार अजून काही रुग्णालयांची उभारणी करण्यात यावी’, अशी मागणी सिसोदिया यांनी पत्राद्वारे राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

‘दिल्लीला अद्याप गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा नाही’

ऑक्सिजनच्या मुद्द्यावर सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, दिल्लीचा अद्याप गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रविवारी दिल्लीला 440 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, दिल्लीचा कोटा हा 590 टन इतका आहे. इतकच नाही तर सध्या दिल्लीतील ऑक्सिजनची मागणी आता 976 मेट्रिक टन इतकी बनली असल्याचंही सिसोदिया म्हणाले.

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आणि संबंधित मुद्द्यांवर सोमवारी उच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराची मदत मिळावी यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं आहे.

गेल्या 24 तासांत 20 हजार 394 नवे कोरोना रुग्ण

संपूर्ण देशासह राजधानी दिल्लीतील कोरोनास्थितीही बिकट होत चालली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. एका दिवसात 400 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा मोठा आहे. दिल्लीतील संसर्गाचं प्रमाण सध्या 31.66 टक्के आहे. जवळपास 50 ङजार 554 रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत.

गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये 20 हजार 394 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 16 हजार 966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 290 इतकी आहे. गेल्या 24 तासांत 24 हजार 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

संबंधित बातम्या :

सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 24 रुग्णांचा मृत्यू; कर्नाटक हादरले

‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत

Delhi Deputy CM Manish Sisodia’s letter to Defense Minister Rajnath Singh