दिवाळीत मोठी दुर्घटना! 10 वर्षांच्या मुलाच्या हातात फटाका फुटला, नंतर ज्याची भीती तेच घडलं
दिवाळीत मोठी दुर्घटना घडलीये. एका दहा वर्षांच्या मुलाच्या हातात फटाका फुटल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने आई रडून बेहाल झाली.

देशात सर्व ठिकाणी दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत दिवाळीत फटाके फोडून आनंद व्यक्त करत आहेत. लहान मुले देखील फराळ खाण्यासहित घराच्या परिसरात फटाके फोडून दिवाळी साजरी करत आहेत. या दिवाळीदरम्यान दिल्लीत मोठी दुर्घटना घडली. हातात फटाका फुटल्याने एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.
दिल्लीच्या नरेला परिसरात 8 नोव्हेंबर 2026 रोजी दहा वर्षांचा मुलगा फटाके फोडत होता. पाऊस फटाका फोडताना अचानक स्फोट झाला. या मुलाच्या छातीला गंभीर दुखापत झाली. हातात फटाका फुटल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूने आई रडून बेहाल झाली आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री 9.45 वाजता घडली. मुलगा घराच्या बाहेर हातात पाऊस फटाका पेटवत होता. त्यावेळी अचानक फटाका हातात फुटला. यामुळे मुलाच्या छातीत गंभीर दुखापत झाली. पोलिसांना रात्री 10.50 वाजता रुग्णालयात मुलगा फटाक्यामुळे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते धावत रुग्णालयात पोहोचले. मृत्यूनंतर मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
दरम्यान, मुलाच्या मृत्यूने त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या आईने वेगळाच दावा केला आहे. मुलाची आई अंजली यांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. आईने म्हटलं की, माझा मुलगा फटाके फोडत होता. त्यावेळी एक दुसरा फटाका त्याच्या अंगावर येऊन फुटला. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेत जखमी झाल्यानंतर रुग्णालायत नेले, त्यावेळी तो श्वास घेत होता. परंतु त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी योग्य उपचार केले नाहीत. कुटुंबीयांना चुकीची वागणूक दिली. आता या प्रकरणात मृत मुलाच्या आईने न्यायाची मागणी केली. तसेच मुलाला मिळालेल्या उपचारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले.