Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली पुढच्या राजकारणाची दिशा!
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याचे म्हटले जात आहे. याच राजीनाम्यावर खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताच विरोधकांकडून कॉकरोच जनता पार्टीचे म्हणजेच सीजेपीचे अभिनंदन केले जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून सीजेपीचे दिल्लीच्या जंतर-मंतरच्या मैदानावर आंदोलन सुरू होते. नीट पेपरफुटीमुळे झालेल्या घोटाळ्यासाठी धर्मेंद्र प्रधान हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी सीजेपीची होती. आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत मोठं वजन असलेल्या खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत वापरलेल्या एका वाक्यात भविष्यात देशाचे राजकारण कसे असेल, याची प्रचिती येत असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे, अशी स्तुती शरद पवार यांनी केली.
NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 25, 2026
शेवटी देशातील लोकशाहीने कात टाकली
तसेच, हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे, असं म्हणत विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. शेवटी देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, असं विधानही पवार यांनी केलंय.
फडणवीस, शिंदे दिल्लला रवाना होणार
दरम्यान, दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे नरेंद्र मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याचे म्हटले जात आहे. या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनाही चांगला वेग आला आहे. प्रधान यांचा राजीनामा झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील रात्री दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.