
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून बदला घेतला आहे. भारताने या मोहिमेच्या अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके आणि पाकिस्तान येथील काही दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. एकूण 9 ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत. दरम्यान, भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बीएसएफचे महासंचालक यांच्यात दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठका घेत आहेत. भारताने मध्यरात्री पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्ल्यानंतर भारताच्या सर्वच यंत्रणा हायअलर्टवर आहेत. भारताचे वायूदल, भूदल आणि नौदल सज्ज आणि दक्ष झाले आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवताळला असून सीमाभागात गोळीबार केला जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन भारताच्या बीएसएफचे महासंचालक थेट मोदींच्या भेटीला दिल्लीत पोहोचले आहेत. या दोन्ही महत्त्वांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बीएसएफचे महासंचालक आणि नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली आहे. साधारण एक तास ही बैठक चालली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळेच एलओसीवर भारताकडून अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. भारतीय जवानांकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. हीच माहिती बीएसएफच्या महासंचालकांनी मोदी यांना दिली आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठका घेतल्या होत्या. यात तिनी दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय गृहमत्री, संरक्षणमंत्री यांचा समावेश होता. या बैठकांमध्ये मोदी यांनी तिन्ही दलांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता. तुम्ही प्रत्युत्तर देण्यास तयार राहा. तुमच्या सोईनुसार टार्गेट ठरवा असेही मोदींनी सेनेला सांगितले होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. आता पुन्हा एकदा बीएसएफचे महासंचालक मोदी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने काही कुरापत केलीच तर भारत नेमकं काय करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.