American tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी एक मोठी घोषणा, भारताला बसला मोठा दणका, भारतीयांमध्ये घबराट, कंपन्या टेन्शनमध्ये

डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव आणू इच्छित आहेत, याचाच एक भाग म्हणून त्यांनी आतापर्यंत भारताविरोधात अनेक प्रतिबंध लागू केले आहेत, आता मोठी बातमी समोर आली आहे.

American tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी एक मोठी घोषणा, भारताला बसला मोठा दणका, भारतीयांमध्ये घबराट, कंपन्या टेन्शनमध्ये
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 20, 2025 | 6:29 PM

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी एच-वन बी व्हिसाची फी वाढवून एक लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 88 लाख रुपये इतकी केली आहे. हा चार्ज येत्या 21 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. दरम्यान याचा सर्वाधिक परिणाम हा भारतीय व्हिसाधारकांवर होणार आहे. कारण यामध्ये जवळपास सत्तर टक्के भारतीयांचा समावेश होतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विमानतळावर चांगलाच गोंधळ उडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-वन बी व्हिसाचं शुल्क वाढवण्याची घोषणा करताच जे भारतीय लोक अमेरिकेत काम करतात मात्र सध्या अमेरिकेच्या बाहेर आहेत, त्या सर्वांनी आपले दौरे अर्धवट सोडून पुन्हा एकदा अमेरिकेची वाट धरली आहे. अमेरिकेतून बाहेर जाणाऱ्या भारतीय व्यक्तींनी देखील आपले सर्व नियोजित दौरे रद्द करून अमेरिकेमध्येच रहाणं पसंत केलं आहे. काही जण तर घोषणा होताच आपला प्रवास अर्धवट सोडून विमानातून खाली उतरले आहेत.

तिकिटांमध्ये प्रचंड वाढ

दरम्यान दुसरीकडे भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही तासांमध्येच दिल्ली ते न्यूयॉर्क तिकिटाचे दर 37 हजार रुपयांहून थेट 70 हजार ते 80 हजारांवर पोहोचले आहेत. विमानाचे तिकीट वाढल्यामुळे अनेक लोकांनी आपला अमेरिकेचा प्लॅन रद्द केला असून, ते भारतातच सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तर जे भारतीय लोक अमेरिकेतून भारतात आले होते, त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेची वाट धरली आहे.

अमेरिका सोडू नका

दरम्यान अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि जेपी मॉर्गन सारख्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिका न सोडण्याचा सल्ला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनुसार एच-वन बी व्हिसावर आता तब्बल एक लाख डॉलर एवढं शुल्क आकारलं जाणार आहे. त्यासाठी 21 सप्टेंबरची मुदत दिली आहे, म्हणजे 21 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत परतणाऱ्या भारतीयांवर कोणतंही शुल्क लागणार नाही, मात्र त्यानंतर तुम्ही जेव्हा एक लाख डॉलर शुल्क भरणार तेव्हाच तुम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे.