कस्तुरीरंगन खरे कर्मयोगी, माझ्यासाठी मार्गदर्शकच नव्हे तर सर्वकाही होते; धर्मेंद्र प्रधान भावूक

प्रसिद्ध वैज्ञानिक आणि इस्रोचे माजी प्रमुख डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन झाले आहे. त्यांचे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यातील योगदान आणि इस्रोच्या अंतराळ कार्यक्रमातील अमूल्य काम लक्षणीय आहे. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.

कस्तुरीरंगन खरे कर्मयोगी, माझ्यासाठी मार्गदर्शकच नव्हे तर सर्वकाही होते; धर्मेंद्र प्रधान भावूक
dr. k. kasturirangan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 27, 2025 | 8:38 PM

इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरींगन यांचं निधन झालं आहे. बंगळुरू येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. त्यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कस्तुरीरंगन यांना सच्चा कर्मयोगी म्हटलं आहे. माझ्यासाठी ते मार्गदर्शकच नव्हते तर त्याहीपेक्षा अधिक मोठे होते, असंही प्रधान यांनी म्हटलं आहे.

पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलेल्या डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधानाने मी प्रचंड दु:खी आहे. त्यांचं निधनाने केवळ वैश्विक वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्राची हानी झालेली नाही, तर माझी वैयक्तिक हानी झाली आहे, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. डॉ. कस्तुरीरंगन एक बौद्धिक दिग्गज होते. त्यांच्या योगदानामुळे आधुनिक भारताच्या वैज्ञानिक, शैक्षणिक आणि नीती परिदृश्याच्या वास्तुकलेला आकार दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते

माझ्यासाठी ते मार्गदर्शकापेक्षाही अधिक होते. ते एक मार्गदर्शक, पथ प्रदर्शक तसेच ज्ञान, करूणा आणि प्रेरणेचे स्त्रोत होते. अनेक वर्षापासून मला त्यांचा स्नेह, आशीर्वाद आणि आणि मार्गदर्शन मिळालं, असंही त्यांनी सांगितलं. ते सच्चे कर्मयोगी होते. ते केवळ एक शानदार वैज्ञानिक वा प्रतिष्ठीत धोरण निर्माते नव्हते तर प्रत्येक अंगाने ते खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माते होते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

भूमिका आणि दूरदर्शीपणाचं प्रमाण

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 तयार करण्यात त्यांची भूमिका आणि दूरदर्शीपणाचा प्रमाण आहे. त्यांचं कुटुंब, सहकारी, आणि त्यांच्या असंख्य विद्यार्थी तसेच विद्वान आणि प्रशंसकांप्रती माझी गहरी संवेदना आहे, असंही त्यांनी म्हटलंय. भारत नेहमीच त्यांची महान बुद्धी, त्यांचे शांत परंतु दृढ नेतृत्व आणि राष्ट्राच्या प्रती त्यांची निस्वार्थ सेवेसाठी ऋणी राहील, असं ते म्हणाले.

 

त्यांनी नव कल्पनांना प्रोत्साहन दिलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डॉ. कस्तुरीरंगन यांच्या निधानावर शोक व्यक्त केला आहे. “डॉ. के. कस्तूरीरंगन यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. ते भारताच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रवासातील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि देशासाठी केलेले निःस्वार्थ योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल. त्यांनी इस्रो (ISRO) मध्ये पूर्ण निष्ठेने सेवा केली आणि भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमाला अशा उंचीवर नेले की, ज्याचे संपूर्ण जगाने कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या उपग्रहांचे प्रक्षेपण झाले आणि त्यांनी नेहमीच नवकल्पनांना (innovation) प्रोत्साहन दिले,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

डॉ. के. कस्तूरीरंगन कोण होते?

डॉ. कस्तूरीरंगन हे भारताचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताच्या विविध अंतरिक्ष कार्यक्रमांमध्ये विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या यशस्वी अंतरिक्ष प्रकल्पांमध्ये ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) आणि भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) यांची यशस्वी चाचणी यांचा समावेश आहे. डॉ. कस्तूरीरंगन यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या सन्मानांनी गौरवले आहे.