Operation Sindoor च्या वेळी किती नुकसान? नौदल अधिकाऱ्याच्या वक्तव्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात

Operation Sindoor : एका भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने इंडोनेशियातील जकार्ता येथे केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने लगेच सरकारला प्रश्न विचारले आहेत. इंडोनेशियातील भारतीय दूतावासाने या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी झालेल्या नुकसानीवरुन देशात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

Operation Sindoor च्या वेळी किती नुकसान? नौदल अधिकाऱ्याच्या वक्तव्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात
Operation Sindoor
| Updated on: Jun 30, 2025 | 9:10 AM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. 7 मे च्या मध्यरात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ, लॉन्च पॅड उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारताने काही फायटर जेट्स गमावले असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी CDS अनिल चौहान यांनी केलं होतं. आता एका भारतीय नौदल अधिकाऱ्याने सुद्धा असच वक्तव्य केलय. त्यावरुन देशात मोठा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. पाकिस्तानातील लष्करी ठिकाणं आणि एअर डिफेन्स सिस्टिमला लक्ष्य करु नका असं भारताच्या राजकीय नेतृत्वाने सांगितलं होतं. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात भारताने काही फायटर जेट्स गमावले असं कॅप्टन शिव कुमार इंडोनेशियातील एका कार्यक्रमात म्हणाले. जून महिन्याच्या सुरुवातीला एका सेमिनारमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

कॅप्टन शिव कुमार हे नौदलातील कर्नल रँकचे अधिकारी आहेत. 31 मे रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अशाच प्रकारच वक्तव्य केलं होतं. इंडियन एअर फोर्सला सुरुवातीला नुकसान झाल्याची कबुली चौहान यांनी दिली होती. पण किती फायटर जेट्स पडले तो आकडा अनिल चौहान यांनी सांगितला नव्हता. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी IAF च किती नुकसान झालं, ते अजून केंद्र सरकारने सांगितलेलं नाही. 7 मे रोजीच तीन राफेलसह भारताची सहा फायटर विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पण पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असं सीडीएस अनिल चौहान यांनी सिंगापूरच्याच कार्यक्रमात स्पष्ट केलं होतं.

काँग्रेसने काय प्रश्न विचारला?

कॅप्टन शिव कुमार यांच्या दाव्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर देशापासून काय लपवत आहेत?” असा प्रश्न काँग्रेसने विचारलाय.

कॅप्टन शिव कुमार काय म्हणाले?

“माझ्याआधी जे इंडोनेशियन स्पीकर बोलले, आम्ही अनेक विमान गमावली, ते चुकीच आहे. त्याच्याशी मी सहमत नाही. पण काही नुकसान झाल्याच मी मान्य करतो. राजकीय नेतृत्वाकडून पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांवर, एअर डिफेन्सवर हल्ला करण्यासाठी ग्रीन सिग्नल नव्हता. त्यामुळे हे नुकसान झालं” असं कॅप्टन शिव कुमार म्हणाले. “सुरुवातीच्या नुकसानीनंतर आम्ही रणनिती बदलली. आम्ही त्यांची लष्करी ठिकाणं आणि रडारवर हल्ले केले. त्यांच्या एअर डिफेन्सची क्षमताच संपवली. त्यामुळे 10 मे रोजी ब्राह्मोसद्वारे आम्ही सहज हल्ले करु शकतो” असं कॅप्टन शिवकुमार म्हणाले.

भारतीय दूतावासाने काय स्पष्टीकरण दिलं?

कॅप्टन शिव कुमार यांचं 20 दिवसापूर्वीच वक्तव्य चर्चेत आल्यानंतर आता काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. कॅप्टन शिव कुमार यांच्या वक्तव्यावर इंडोनेशियातील भारतीय दूतावासाने स्पष्टीकरण दिलं आहे. “कॅप्टन शिव कुमार यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनी, त्यांच्या सांगण्यामागचा उद्देश आणि महत्त्व चुकीच्या पद्धतीने सादर केलं” असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.