e-Passport लाँच; डिजिटल इंडियाची नवीन ओळख तुमच्या हातात

ई-पासपोर्ट केवळ एक दस्तावेज नाही. तर पासपोर्ट सेवा डिजिटल करण्याचा प्रयोग आहे. लवकरच ही सुविधा तुमच्या जवळच्या पासपोर्ट केंद्रावर उपलब्ध होईल. तर ज्यांच्याकडे जुना पासपोर्ट आहे, ते त्याचा वापर करू शकतात.

e-Passport लाँच; डिजिटल इंडियाची नवीन ओळख तुमच्या हातात
e passport
| Updated on: Sep 20, 2025 | 3:06 PM

परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्ट सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे दस्तावेज आधुनिकरित्या सुरक्षित जतन होतील. एप्रिल 2024 मध्ये पायलट प्रकल्प म्हणून हा प्रयोग सुरू करण्यात आला होता. आता देशभरात टप्प्याटप्प्यात पासपोर्ट सेवा केंद्रापर्यंत ही डिजिटल सेवा पोहचेल आणि ई-पासपोर्ट वितरीत होतील. जून 2025 पासून औपचारिकरित्या देशभरात ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

काय आहे ई-पासपोर्ट?

ई-पासपोर्ट दिसायला जुन्या पासपोर्टसारखाच आहे. पण त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाप आता दिसेल. त्याच्या कव्हरवर RFID चिप आणि ॲन्टेना लागलेला असेल. यामध्ये पासपोर्ट धारकाची संपूर्ण माहिती डिजिटल पद्धतीनं जतन करण्यात येईल. बोटांची ठसे आणि डिजिटल फोटो सुरक्षित राहतील. यामुळे पासपोर्टची बोगस कॉपी तयार करणे कठीण होईल. या कव्हरवरील Passport शब्दाच्या खाली सोनेरी रंगाचे एक चिन्ह असेल. त्यामुळे ई-पासपोर्ट लागलीच ओळखता येईल. हा पासपोर्ट जागतिक ICAO मानांकनानुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात त्याला मान्यता असेल.

पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0

सुरुवातीला ई-पासपोर्ट सेवा ही केवळ चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, सूरत, नागपूर, गोवा, जम्मू, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, रांची आणि दिल्ली येथील पासपोर्ट सेवा केंद्रावर उपलब्ध होती. पण आता पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत देशभरात सुरू झाली आहे. अर्थात सर्वच केंद्रावर ही सेवा अजून सुरु झाली नाही. काही केंद्रावर ती लवकरच पोहचणार आहे. नागरिकांना ई-पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे.

असा करा अर्ज

  • पासपोर्ट सेवा पोर्टलवर जाऊन नोंदणी/लॉगिन करा
  • ऑनलाईन अर्ज भरून जवळचे पासपोर्ट सेवा केंद्र निवडा
  • निश्चित शुल्क ऑनलाईन जमा करा आणि अपॉईंटमेंट बुक करा
  • निश्चित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह या केंद्रावर पोहचा
  • येथे व्हेरिफिकेशन आणि बायोमॅट्रिक कॅप्चर नंतर ई-पासपोर्ट देण्यात येईल

काय होईल फायदा?

  1. ई-पासपोर्टमुळे प्रवाशांना अनेक लाभ होतील
  2. सुरक्षा चिपमधील डेटा बदल अथवा त्यात बोगसपणा करता येणार नाही
  3. विमानतळावरील इमिग्रेशन प्रक्रियेला वेग येईल. ऑटोमेटेड ई-गेट्सवर फायदा दिसेल
  4. जगभरात या ई-पासपोर्टला मान्यता असेल
  5. इलेक्ट्रॉनिक आणि बायोमॅट्रिक फीचर्समुळे नागरिकांची माहिती चोरता येणार नाही