मोठी बातमी! गुजरातच्या राजकारणात खळबळ, मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांनी दिले राजीनामे, नेमकं काय घडतंय?

गुजरातच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, सरकारमधील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्वच मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.

मोठी बातमी! गुजरातच्या राजकारणात खळबळ, मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांनी दिले राजीनामे, नेमकं काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2025 | 5:34 PM

गुजरातच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, सरकारमधील सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्वच मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सोपवले आहेत. यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारामधील अडचण दूर झाली आहे. उद्या गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. आज रात्री उशिरा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे राज्यपालांकडे या मंत्र्यांचे राजीनामे देणार आहेत. यासोबतच नव्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री शपथ घेणार आहेत, त्यांच्या नावाची यादी देखील राज्यपालांकडे दण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजे शुक्रवारी भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यापूर्वीच भाजपाच्या एक वरिष्ठ नेत्याने देखील सांगितलं होतं की पुढील मंत्रिमंडळ विस्तारात गुजरातला दहा नवे मंत्री मिळू शकतात, एवढंच नाही तर अर्ध्याहून अधिक मंत्र्यांना बदलण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं होतं, या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी सकाळी साडे आकरा वाजता होणार आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह गुजरातच्या मंत्रिमंडळात 17 मंत्री आहेत. त्यातील आठ कॅबिनेट तर इतर सर्व जण राज्यमंत्री आहेत. गुजरातच्या विधानसभेची सदस्य संख्या 182 आहे, त्यामुळे एकूण सदस्य संख्येच्या 15 टक्के किंवा 27 मंत्री होऊ शकतात.

आता पुढे काय होणार?

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, उद्या सकाळी नवं मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. ज्यांची नव्यानं मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे, जे सदस्य मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत, त्यांना त्याबाबत आज रात्री उशिरा माहिती देण्यात येणार आहे, समोर आलेल्या माहितीनुसार ज्या नेत्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे, त्यातील तीन ते चार जणांची वर्णी देखील मंत्रि‍पदी लागू शकते.