
2019 मध्ये केरळमधील वायनाड मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठे यश मिळाले होते. त्यावेळी त्यांनी अमेठीतून देखील निवडणूक लढवली होती. पण त्यांना त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला होता. स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. पण आता एक्झिट पोलनुसार वायनाडमधून राहुल गांधींना २०२९ सारखेच यश मिळताना दिसत नाहीये. कारण त्यांच्या मतांची टक्केवारी १४ टक्क्यांनी कमी होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
स्थानिक मीडिया हाऊस VMR-मनोरमा न्यूजच्या एक्झिट पोलने राहुल गांधी यांना या निवडणुकीत मिळणाऱ्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी देखील राहुल गांधी दोन ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. वायनाड व्यतिरिक्त राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत.
VMR-मनोरमा न्यूजच्या एक्झिट पोलनुसार, यावेळी राहुल गांधींना वायनाडमध्ये 50% मते मिळतील. मागच्या निवडणुकीत त्यांना 64% पेक्षा जास्त मतं मिळाली होती. म्हणजेच आता 14% मतं कमी होणार आहेत. राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक जिंकतील असा अंदाज वर्तवला जात असला तरी त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये अमेठी मतदारसंघातून भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर वायनाड हे त्यांचे पहिले राजकीय ठिकाण बनले आहे. मात्र, या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यावेळीही केरळमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार आहे.
यूडीएफला राज्यात 20 पैकी 16 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. सीपीएमच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) केवळ 2 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.
या एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे काँग्रेस नेते राहुलला धक्का बसू शकतो, पण दुसरीकडे केरळमध्ये भाजपला एकही जागा मिळताना दिसत नाहीये. व्हीएमआर-मनोरमा न्यूजच्या एक्झिट पोलनुसार, यावेळीही भाजपला केरळमध्ये यश मिळणार नाही असा दावा केला जात आहे.
तिरुअनंतपुरम आणि पठाणमथिट्टा लोकसभा मतदारसंघात भाजप दुसऱ्या क्रमांकाचे पक्ष राहिल अशी शक्यता वर्तवली गेली आहे. तर त्रिशूरमध्ये तिसरे स्थानी असेल. पण केरळमध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढत असल्याचं देखील समोर आले आहे.
ॲक्सिस माय-इंडियाच्या एक्झिट पोलनुसार केरळमध्ये यावेळी यूडीएफला 17 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 2 ते 3 जागा आणि एलडीएफला शून्य ते 1 जागा मिळण्याची शक्यता आहे.