AUS vs ENG : चाललंय काय? पुन्हा कॅप्टन बदलला, चौथ्या टेस्टसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर, नेतृत्व कुणाकडे?
Australia vs England Boxing Day Test Squad : ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 2025 या वर्षातील शेवटच्या आणि एशेल सीरिजमधील चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा कॅप्टन बदलला आहे.

ऑस्ट्रेलियाने मायदेशात इंग्लंड विरुद्ध सलग तिसरा सामना जिंकून प्रतिष्ठेची एशेस सीरिज आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. स्टीव्हन स्मिथ याने पहिल्या 2 सामन्यात ऑस्ट्रेलियाला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातून नियमित कर्णधार पॅट कमिन्स याचं कमबॅक झालं. पॅटच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात मैदान मारत मालिका जिंकली. आता ऑस्ट्रेलिया चौथ्या सामन्यात विजयी चौकारासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने या चौथ्या सामन्यासाठी टीम जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा सामना हा (Boxing Day Test) 26 ते 31 डिसेंबर दरम्यान होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तसेच 2 बदल करण्यात आले आहेत. नियमित कर्णधार पॅट कमिन्स आणि फिरकीपटू नॅथन लायन या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर झाय रिचर्डसन आणि टॉड मर्फी या जोडीचं कमबॅक झालं आहे. नॅथन लायन याला दुखापतीमुळे चौथ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. तर पॅटला योजनेनुसार बाहेर करण्यात आलं आहे.
झायला पॅटच्या जागी संधी देण्यात आली आहे. तर मर्फीचा लायनच्या जागी समावेश करण्यात आला आहे. उभयसंघातील चौथ्या सामन्याचा थरार हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न इथे रंगणार आहे.
झाय रिचर्ड्सनचं 4 वर्षांनंतर कमबॅक
झाय रिचर्ड्सन याचं 4 वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. झायने अखेरचा कसोटी सामना हा इंग्लंड विरुद्ध 2021 साली खेळला होता. त्यानंतर आता झायला 4 वर्षांनंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार का? याकडे लक्ष असणार आहे. झायने आतापर्यंत 3 कसोटी सामन्यांमध्ये 11 विकेट्स मिळवल्या आहेत.
स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्वाची जबाबदारी
पॅटच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा स्टीव्हन स्मिथ चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. स्टीव्हनने त्याच्या नेतृत्वातील पहिल्या 2 सामन्यात ऑस्ट्रेलियाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. आता ऑस्ट्रेलिया सलग चौथा विजय मिळवणार की इंग्लंड कमबॅक करण्यात यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, ब्रँडन डॉगेट, कॅमरन ग्रीन, ट्रेव्हीस हेड, जॉश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, टॉड मर्फी, मायकल नेसर, झाय रिचर्ड्सन, मिचेल स्टार्क, जेक वेदरॉल्ड आणि ब्यू वेब्स्टर.
