Explainer : ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट नेमकं काय? ते काम कसं करतं?

| Updated on: Feb 05, 2021 | 10:04 PM

भारतातील शेतकरी आंदोलनावर उघडपणे सोशल मीडियावर भाष्य करणारी स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग सध्या भारतात प्रचंड चर्चेत आहे. (Greta Thunberg Sweden Climate Change Activist tweet)

Explainer : ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट नेमकं काय? ते काम कसं करतं?
Follow us on

नवी दिल्ली : स्वीडनची पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग सध्या भारतात प्रचंड चर्चेत आहे. ग्रेटा थनबर्ग ही भारतातील शेतकरी आंदोलनावर उघडपणे सोशल मीडियावर भाष्य करत आहे. ग्रेटाने बुधवारी सोशल मीडियावर एक टूलकिट डॉक्युमेंट शेअर केलं होतं. आता हे टूलकिट बनवणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केलं आहे. आधी ग्रेटावर FIR झाल्याची चर्चा होती, मात्र नंतर हे FIR ग्रेटावर नव्हे तर हे टूलकिट बनवणाऱ्यांविरोधात असल्याचं उघड झालं. हेच टूलकिट ग्रेटाने शेअर केलं होतं. (Greta Thunberg Sweden Climate Change Activist tweet; Delhi Police Filed FIR)

दिल्ली पोलिसांच्या FIR नंतरही ग्रेटाने आपण अजूनही शेतकरी आंदोलकांसोबत आहोत, असं सोशल मीडियावर लिहिलं. कोणतीही भीती किंवा धमकी मला रोखू शकत नाही, असं ग्रेटा म्हणाली. मात्र ग्रेटाने जे टूलकिट शेअर केलं, ते नेमकं काय आहे? हे टूलकिट यापूर्वीही वापरलं होतं? दिल्ली पोलिसांनी जो FIR केला आहे, त्याचा नेमका अर्थ काय? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते आहेत.

ग्रेटा थनबर्गने नेमकं काय केलं?

ग्रेटा थनबर्गने मंगळवारी सोशल मीडियावर आपली पोस्ट केली. भारतातील शेतकरी आंदोलनाप्रती एकजूट दाखवू असं ग्रेटा म्हणाली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा तिने सोशल मीडियावर टूलकिट नावाचं एक डॉक्युमेंट शेअर केलं. थोड्यावेळानंतर ते डिलीट करुन अपडेट टूलकिट शेअर केलं. याच टूलकिटमुळे वाद उफाळला आहे.

हे टूलकिट नेमकं काय आहे?

टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे.

असं टूलकिट पहिल्यांच चर्चेत आलंय का?

अशाप्रकारचं टूलकिट पहिल्यांदाच वापरात आहे असं अजिबात नाही. गेल्यावर्षी अमेरिकेत पोलिसांनी एका कृष्णवर्णीयाची भररस्त्यात हत्या केली होती. त्यावेळी तिथे ‘ब्लॅक लाईफ मॅटर’ ही मोहीम सुरु झाली होती. भारतासह जगभरातील सेलिब्रिटींसह नागरिकांनी रंगभेदाविरोधात आवाज उठवला होता. हे आंदोलन किंवा मोहीम सुरु करणाऱ्यांनी टूलकिट बनवलं होतं.

यामध्ये आंदोलनाबाबत सर्व माहिती दिली होती. जसे – आंदोलनात कसं सहभागी व्हावं, कोणत्या ठिकाणी जावं, कुठे जाऊ नये, पोलिसांनी कारवाई सुरु केली तर काय करावं? आंदोलनावेळी कपडे कोणते घालावेत, ज्यामुळे आंदोलन योग्य व्हावं, पोलिसांनी पकडलं तर काय करावं? आंदोलकांचे अधिकार काय, अशी सर्व माहिती होती. याशिवाय हाँगकाँगमध्ये चीनविरोधात जे आंदोलन सुरु होतं, त्यावेळीही अशा प्रकारचं टूलकिट वापरण्यात आलं होतं.

ग्रेटा स्वीडिश नागरिक, दिल्ली पोलीस कारवाई कशी करणार?

पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही स्वीडनची नागरिक आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस तिच्याविरोधात कारवाई कशी करणार, असा प्रश्न आहे. मात्र जो नागरिक आपल्या देशाचा नागरिकच नाही, त्याच्याविरोधात आपण कोणतीही कायदेशीर कारवाई करु शकत नाही, हे केवळ पोलिसांचं तंत्र आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

कोण आहे ग्रेटा थनबर्ग?

ग्रेटा थनबर्ग ही अवघी 18 वर्षांची स्वीडनची नागरिक आहे. ग्रेटाचा जन्म 3 जानेवारी 2003 रोजी स्टॉकहोममध्ये झाला. ग्रेटाचे आजोबा एस. अरहॅनियस वैज्ञानिक होते. ग्रीनहाऊस इफेक्टवर त्यांनी एक मॉडेल तयार केलं होतं, या कामगिरीमुळे 1903 साली रसायनशास्त्रातलं नोबल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. तिची आई मालेना एमान एक ऑपेरा सिंगर आहे, तर वडील स्वांते थनबर्ग अभिनेते आहेत.

ग्रेटा 11 वर्षांची होती तेव्हापासून ती ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी कार्यरत आहे. यासाठीच ग्रेटा दर शुक्रवारी स्वीडनच्या संसदेबाहेर निदर्शने करु लागली. तिने सुरु केलेली ही मोहीम #FridaysForFuture या नावाने ओळखली जाते. तिच्या या मोहिमेत आतापर्यंत अनेक देश जोडले गेले आहेत. ग्रेटाप्रमाणे जगभरातील हजारो मुलं ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी आवाज उठवित आहेत.

2019 मध्ये UN मध्ये तिने ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदल या विषयावर एक भाषण केले होते. तिच्या या भाषणाची जगभरात खूप चर्चा झाली. या भाषणात ग्रेटाने जगभरातील नेत्यांवर सडकून टीका केली. तिच्या या भाषणानंतर टाईम मासिकाने तिला 2019 साली पर्सन ऑफ द ईयर हा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला होता.

संबंधित बातम्या

Greta Thunberg | धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटाचं नवं ट्विट

ग्रेटा आणि रिहाना, बंद करा तुमचा टीका करण्याचा बहाणा; रामदास आठवलेंचा काव्यमय टोला

(Greta Thunberg Sweden Climate Change Activist tweet; Delhi Police Filed FIR)