भारतातील ९५ टक्के लोकांच्या डोक्यात शेण; माजी न्यायमूर्तींचं वादग्रस्त विधान, म्हणाले- मतदानाचा अधिकारच देऊ नये
Markandey Katju Statement News: 95 टक्के लोकांची मने शेणाने भरलेली आहेत. त्यांना मतदानाचा हक्क देऊ नये, असं माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी भारतातील 95 टक्के लोकसंख्या अज्ञानी असून त्यांची डोकी शेणाने भरलेली आहेत, असे म्हटले आहे. त्यांना मतदानाचा हक्क देऊ नये. त्यांची डोकी जातीयवाद आणि सांप्रदायिकतेने भरलेली आहेत. ते महागाई, बेरोजगारी इत्यादी समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि मेंढ्यांप्रमाणे जातीयवाद व सांप्रदायिकतेसाठी मतदान करतात, असं ते म्हणाले आहेत. यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मार्कंडेय काटजू म्हणाले की, जेव्हा मला मतचोरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा मी म्हणालो की आणखी मते चोरली पाहिजेत. तुम्ही लोक मतदानाच्या लायकीचे नाही. 95 टक्के मतदार गुणवत्ता पाहत नाहीत. ते उमेदवारांच्या जातीच्या आधारावर मतदान करतात. तुम्ही मतदानाच्या लायकीचे आहात का? तुमची डोकी शेणाने भरलेली आहेत. 95 टक्के लोकांची मने शेणाने भरलेली आहेत. त्यांना मतदानाचा हक्क देऊ नये. मी म्हणतो की आणखी मते चोरली पाहिजेत. 90 टक्के मतदार मतदानाच्या लायकीचे नाहीत.
ते म्हणाले की, या देशात लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे केवळ जातीयवाद आणि सांप्रदायिकता वाढेल. देशात कुठे ना कुठे निवडणुका होतातच. निवडणुकीचे वातावरण नेहमीच असते. आपले पक्ष निवडणुकीच्या काळात द्वेष पसरवतात, हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवतात. लोकशाही हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. ती भारताचे मुख्य शत्रू असलेल्या जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला बळकट करते आणि प्रोत्साहन देते.
याव्यतिरिक्त मार्कंडेय काटजू यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी शांतता करारावर स्वाक्षरी करण्यावर टीका केली. सीजेपीच्या आंदोलनाबाबत माजी न्यायाधीश काटजू म्हणाले, ज्यांनी शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे, त्यांचे राजकीय भवितव्य संपले आहे. जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण ते फरार आहेत. त्यांची प्रतिमा फरारांची झाली आहे. ब्रिटिश राजवटीत, अधिकारी अटक केलेल्या लोकांकडून माफीची मागणी करत असत. जे माफी मागत, त्यांची कारकीर्द संपुष्टात येत असे.
ते पुढे म्हणाले की, शांतता करारावर स्वाक्षरी करण्याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ असा की तुम्ही जाहीर केले आहे की तुम्ही यापुढे आंदोलन करणार नाही. जर तुम्ही आंदोलन केले, तर पोलीस म्हणतील की तुम्ही शांतता भंग करत आहात, तुमच्या शांतता कराराचे उल्लंघन करत आहात. अलीकडेच सौरव दास आणि आशुतोष रांका यांना एका आठवड्यासाठी तुरुंगात टाकण्यात आले होते, पण आता त्यांना अधिक काळासाठी तुरुंगात टाकले जाईल. ते सर्व तुरुंगात जाण्यास घाबरत आहेत. सीजेपी आता संपली आहे. तिचा कणा मोडला आहे.”