मध्यरात्री 3 वाजता सगळे गाढ झोपेत, बसमध्ये तेव्हा अचानक अघटित घडलं… क्षणात माजला गोंधळ, तिथे काय घडलं ?
उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर पहाटे एका डबल डेकर एसी स्लीपर बसला भीषण आग लागली. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्वरित बसमधून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेने बस सुरक्षा नियमांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मध्यरात्रीची वेळ.. गंगा एक्सप्रेसवेवर एक डबल डेकर एसी स्लीपर बस भरधाव वेगाने धावत होती. बसमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. पण अचानक बसच्या आत धूर पसरू लागला. काही क्षणांतच झोपेचं वातावरण घबराटीत बदललं. प्रवासी जागे झाले, कुणी मुलांना उचललं, तर कुणी सामानाची पर्वा न करता जीव वाचवण्यासाठी बसबाहेर धाव घेतली. आणि पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भयंकर विळख्यात सापडली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर घडली. दिल्लीहून सिद्धार्थनगरकडे निघालेल्या एसी स्लीपर डबल डेकर बसला पहाटे भीषण आग लागली. सुदैवाची बाब म्हणजे बसमधील सर्व 15 प्रवाशांनी वेळेवर बाहेर पडत आपला जीव वाचवला. हा प्रकार बहादूरगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडला. यामुळे मोठी खळबळ माजली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, बस रस्त्यावर वेगाने असतानाच एसी यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर बसमध्ये धूर पसरला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बसला कवेत घेतले. मात्र प्रवाशांनी प्रसंगावधान राखत तातडीने बसमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच सर्वजण सुरक्षित बाहेर आले. थोडासा जरी उशीर झाला असता, तर हा अपघात मोठ्या जीवितहानीत बदलला असता.
पोलिस आणि फायर ब्रिगेडने सांभाळला मोर्चा
बसला लागलेल्या या आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत डबल डेकर बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. पोलीसांनी बस चालक शिवकुमार (रा. बस्ती) आणि प्रवाशांचे जबाब नोंदवले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
सध्या एसीमधील शॉर्ट सर्किट हे आगीमागील प्राथमिक कारण मानले जात आहे. मात्र, तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीसांनी सांगितले आहे. त्यामुळे अंतिम निष्कर्ष तपास अहवालानंतरच समोर येणार आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत धावत्या बसांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बसांची फिटनेस तपासणी वेळेवर केली जाते का? इलेक्ट्रिकल यंत्रणेची नियमित देखभाल केली जाते का? आणि विशेषतः लांब पल्ल्याच्या रात्रीच्या बससेवांमध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे का? या प्रश्नांची उत्तरं आता संबंधित यंत्रणांना द्यावी लागणार आहेत.