
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा देखील समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर आता जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा एजन्सीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधून 1500 पेक्षा अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या लोकांना काश्मीरच्या संवेदनशील भागांमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या लोकांचा समावेश आहे.
दहशतवादी प्रकरणाशी संबंधित प्रकरणात यापूर्वी ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, अशा लोकांचा यामध्ये समावेश आहे. या दहशतवाद्यांना ज्यांनी आश्रय दिला होता, त्यांचा शोध देखील सुरू आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. संशयित लोकांची चौकशी सुरू आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांकडून छापेमारी सुरू आहे, या हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांच्या स्लीपर सेल्सचा शोध सुरू करण्यात आला आहे. या दहशतवाद्यांना कोणी अश्रय दिला होता, त्यांना शस्त्र कोणी पुरवली याचा शोध आता घेण्यात येत आहे. सुरक्षा बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
वीस लाखांच्या बक्षीसाची घोषणा
दरम्यान जम्मू -काश्मीर पोलिसांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे, हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला वीस लाखांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. पोलिसांकडून या हल्लोखांचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून पाकिस्तानला थेट इशारा देण्यात आला आहे. असल्या भ्याड हल्ल्याला भारत घाबरत नाही. दहशतवाद्यांना असं उत्तर दिलं जाईल की संपूर्ण जग बघत राहील, जे पडद्यामागचे सूत्रधार आहेत, त्यांना देखील शिक्षा होणार असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये बंदची हाक
दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी संचारबंदी सदृश्य परिस्थिती होती. सुरक्ष यंत्रणांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू -काश्मीरमधील काही जणांना तब्यात घेतलं आहे.