ज्ञानेश कुमार यांच्यासाठी ऑक्टोबरचे 3 दिवस धोक्याचे? 2, 4 आणि 6 तारखेला देशात मोठं काय घडणार?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासाठी ऑक्टोबरमधील 2, 4 आणि 6 हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. कथित निवडणूक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत या दिवशी देशभरात तीन मोठे मोर्चे निघणार आहेत. मुंबईत जनरेशन झेडचा जलभरो आंदोलन, ठाकरे बंधूंचा मोर्चा आणि दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रावर दबाव वाढवेल, ज्यामुळे कुमार यांच्या भवितव्याचा फैसला होण्याची शक्यता आहे.

ज्ञानेश कुमार यांच्यासाठी ऑक्टोबरचे 3 दिवस धोक्याचे? 2, 4 आणि 6 तारखेला देशात मोठं काय घडणार?
gyanesh kumar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 3:11 PM

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ऑक्टोबरचे तीन दिवस अत्यंत धोक्याचे आहेत. या तीन दिवसात ज्ञानेश कुमार यांच्या भवितव्याचा फैसला होण्याची शक्यता आहे. या तिन्ही दिवशी देशात तीन मोठी आंदोलनं होणार आहेत. तिन्ही दिवशी जनतेचा मोठा मोर्चा निघणार असल्याने केंद्र सरकारवरही दबाव वाढणार आहे. त्यामुळे या मोर्चांच्या आधीच ज्ञानेश कुमार हे राजीनामा देणार की मोर्चानंतर हे पाहावं लागणार आहे. तसेच केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

2 तारखेला गाठ जेनजीशी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित निवडणूक घोटाळ्यावरून देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने या आंदोलनात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सीजेपीने येत्या 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर हा मोर्चा होणार आहे. या मोर्चात जेनजी उतरणार असल्याने मोर्चाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे हा केवळ मोर्चा नाहीये, तर जलभरो आंदोलन आहे. त्यामुळे मुंबईचं वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...

4 तारखेला ठाकरेंशी गाठ

सीजेपीच्या आंदोलनानंतर लगेचच 4 ऑक्टोबर रोजी ठाकरे बंधूंचा मोर्चा पार पडणार आहे. ठाकरे बंधूंचा मोर्चाही मुंबईतच होणार आहे. भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा होणार आहे. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चात सर्व विरोधी पक्षांना सामील होण्याचं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ठाकरे बंधूंच्या या मोर्चाकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

6 तारखेला इंडिया आघाडीचं टेन्शन

6 ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीने मोर्चाची हाक दिली आहे. हा मोर्चा दिल्लीत होणार आहे. सर्व पक्षांचे खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होईल. हा मोर्चा मुख्य निवडणूक आयोगावर काढण्यात येणार आहे. काँग्रेस, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, डावे पक्षांसह एकूण 20 पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याने या मोर्चाकडेही संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us