क्रूजरचा भयानक अपघात, दाट धुकं पसरलेलं, ड्रायव्हरला वाटला रस्ता, पण पुढे होता… 10 जण बेपत्ता

लग्नाच मंगल कार्य आटोपून घरच्या वाटेवर असताना एक अमंगल घटना घडली. 10 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. हे सर्व क्रूजर गाडीने परतत होते. क्रूजरमध्ये 13-14 लोक असण्याची शक्यता आहे.

क्रूजरचा भयानक अपघात, दाट धुकं पसरलेलं, ड्रायव्हरला वाटला रस्ता, पण पुढे होता... 10 जण बेपत्ता
Accident
Image Credit source: Screengrab
| Updated on: Feb 01, 2025 | 11:58 AM

सध्या देशात थंडीचा सीजन सुरु आहे. पहाटेच्या सुमारास अनेक भागात दाट धुक पसरलेलं असतं. या धुक्यामुळे अनेक अपघात होतात. रात्री उशिरा असाच एक भयानक अपघात घडला. एक क्रूजर गाडी कालव्यामध्ये पडली. 10 जण बेपत्ता आहेत. रेस्क्यू दरम्यान एका 10 वर्षाच्या मुलाला वाचवण्यात आलं. 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळाला. पंजाब येथे एक कार्यक्रम आटोपून हे लोक परत येत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. सध्या बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. हरियाणाच्या फतेहाबादमध्ये हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, महमडा गावातील काही लोक पंजाब येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. हे लोक रात्री 10 च्या सुमारास क्रूजर गाडीने परतत होते. त्यांची गाडी रतिया गावातील खाई येथून सरदारेवालाकडे जात होती. त्यावेळी भाखडा कालव्याच्या पुलावर दाट धुक्यामुळे गाडीच नियंत्रण सुटलं व गाडी कालव्यात पडली. गाडी नदीत कोसळण्याआधी ड्रायव्हर उडी मारुन बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला.

सर्वांना धक्का बसला

गाडीत बसलेले 12 लोक कालव्यात पडले. यात एक 10 वर्षांचा मुलगा होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरु केलं. 10 वर्षाच्या मुलाला बाहेर काढलं. 55 वर्षीय बलबीर सिंह यांचा मृतदेह मिळाला आहे. गाडीचा ड्रायव्हर जरनैल सिंहने गाडीतून उडी मारली. या घटनेनंतर गावात सर्वांना धक्का बसला आहे. मोठ्या संख्येने आसपासच्या गावातील लोक तिथे पोहोचले. रतिया पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचून तपास करत आहे.

लोक लग्नावरुन परतत असताना

हेड कॉन्स्टेबल गुरमीत सिंह म्हणाले की, “लोक लग्नावरुन परतत असताना हा अपघात झाला. रस्त्यात खूप धुकं होतं. त्यामुळे असं वाटतय की, रस्ता दिसला नाही आणि गाडी कालव्यात कोसळली. किती लोक गाडीत होते, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. 13-14 लोक असण्याची शक्यता आहे. मुलाला बाहेर काढलं. अन्य लोकांचा शोध सुरु आहे”