दिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक भागांत पाणी साचले, विमानसेवेवर परिणाम

दिल्लीसाठी शनिवारी रात्री उशिरा हवामान विभागाने पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानंतर काही तासांतच जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसाचा परिणाम विमानसेवेवर झाला आहे. तसेच दिल्लीतील अनेक रस्ते जलमय झाले आहे.

दिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक भागांत पाणी साचले, विमानसेवेवर परिणाम
दिल्लीत मुसळधार पावसानंतर रस्ते जलमय
| Updated on: May 25, 2025 | 8:29 AM

Rain Update: देशातील अनेक भागात मुसळधार अवकाळी पाऊस सुरु आहे. राजधानी दिल्लीत पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीच्या आसपासच्या भागात हवामानात अचानक बदल झाला आहे. शनिवारी संध्याकाळी उशिरा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानंतर काही तासांतच हवामानात मोठा बदल झालेला दिसून आला. शनिवार रात्री आणि रविवारी सकाळी दिल्लीत जोरदार वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक भागात पाणी साचले. अनेक झाडे उन्मळून पडली. मिंटो ब्रिजवर कार पाण्यात बुडाली. वाहतूक आणि विमानसेवा प्रभावित झाली आहे.

हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ६० ते ८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला होता. याअंतर्गत दिल्ली-एनसीआरसाठी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. नवी दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. मिंटो रोड, हुमायून रोड आणि शास्त्री भवनसारखे परिसर पाण्याखाली गेले होते. तसेच मिंटो ब्रिजवर पुन्हा पाणी साचले आहे. नेहमी मुसळधार पावसानंतर या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

दिल्लीत मुसळधार पाऊस

दिल्लीत झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम विमान सेवेवर झाला आहे. यासंदर्भात इंडिगोने ‘एक्स’ वर माहिती दिली की, दिल्लीतील खराब हवामानामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या विमानाची परिस्थिती तपासावी. शनिवारी रात्री उशिरा हवामान विभागाने पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला. त्यानंतर काही तासांतच जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. याशिवाय महाराष्ट्रातही हवामान बदलला असून अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे.

दरम्यान, हवामान विभागाने २५ ते २८ मे पर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. २९ मे रोजीही अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. या काळात तापमानात फारशी वाढ होणार नाही.