Operation Sindoor : पाकिस्तानने किती विमानं पाडली? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं संसदेत एकदम कडक उत्तर

Operation Sindoor : "विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरवरुन उचित प्रश्न विचारत नाहीय. मी चार दशकापासून राजकारणात आहे. आज विरोधी पक्ष प्रश्न विचारण्यात अपयशी असेल, तर मी त्यांना मदत करु इच्छितो. आम्ही आज सत्ताधारी आहोत, याचा अर्थ असा नाही की, आम्ही नेहमीच सत्तेवर राहू. आम्ही दीर्घकाळ विरोधी पक्षात राहून काम केलय" असं राजनाथ सिंह म्हणाले.

Operation Sindoor : पाकिस्तानने किती विमानं पाडली? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं संसदेत एकदम कडक उत्तर
Rajnath Singh
| Updated on: Jul 28, 2025 | 3:04 PM

संसदेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून अनेकदा ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चेची मागणी करण्यात आली. संसदेच विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी झाली. आज सकाळी संसेदत मोठा गदारोळ पहायला मिळाला. त्यामुळे सुरुवातीला कामकाज तहकूब करावं लागलं. दुपारनंतर राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात प्रश्नांची उत्तर दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, “कुठल्याही देशात जनता सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवते. सत्ताधाऱ्यांच काम असतं जनतेच हित ध्यानात ठेऊन काम करणं आणि विरोधी पक्षांच काम असतं सरकारला जनतेशी संबंधित मुद्दे, प्रश्न विचारणं”

“ऑपरेशन सिंदूर का सुरु केलं? याची माहिती याआधी सुद्धा दिली आहे. आज सुद्धा मी माहिती देतोय. कधी कधी विरोधी पक्षाचे लोक विचारतात की, त्यांनी किती विमानं पाडली? मला असं वाटतं की, त्यांचा हा प्रश्न राष्ट्रीय जनभावनेच प्रतिनिधीत्व करत नाही. त्यांनी एकदाही असं विचारलं नाही की, आपल्या सैन्याने शत्रूची किती विमानं पाडली. त्यांना प्रश्न विचारायचा असेल, तर त्यांनी विचारावं की, भारताने दहशतवादी धुळीस मिळवले का? तर त्याचं उत्तर हो आहे” असं राजनाथ सिंह म्हणाले.

‘तुम्हाला प्रश्न विचारायचाच असेल, तर…’

“मी विरोधी पक्षाच्या सन्मानित सदस्यांना सांगू इच्छितो की, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का? त्याचं उत्तर हो आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल, तर त्यांनी प्रश्न विचारावा की, ज्या दहशतवाद्यांनी बहिणींच सिंदूर मिटवलं, त्यांचं काय झालं? ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही त्या दहशतवाद्यांच्या लीडरनाच संपवलं” असं राजनाथ सिंह म्हणाले. प्रश्न विचारायचाच असेल, तर ऑपरेशन सिंदूरमध्ये शूर सैनिकांच काही नुकसान झालं का? त्या बद्दल विचारावं, याच उत्तर आहे नाही, भारतीय सैनिकांच नुकसान झालेलं नाही. लक्ष्य मोठं असेल, तेव्हा छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही गेलं पाहिजे” असं राजनाथ सिंह म्हणाले.