
जम्मू- काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, दहशतवाद्यांनी नाव विचारून गोळीबार केला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे.
दरम्यान सिंधू जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानं त्याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसणार आहे. भारत सरकार सिंधू जल वाटप कराराच्या स्थगितीची अंमलबजावणी नेमकी कशी करणार यासंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही, सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय तीन टप्प्यात होणार आहे. जागतिक बँकेला देखील यांची संपूर्ण माहिती दिली जाणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
अमित शाह अॅक्शन मोडमध्ये
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे, त्यांनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश अमित शाह यांनी या बैठकीत मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. यादी समोर आल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर बैठकींचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे उत्तर काश्मीरमध्ये रात्रीपासून राफेल विमान घिरट्या घातल आहे, राजस्थान बॉर्डरवरील बीएसएफ फैजांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लष्कर प्रमुखांकडून नियंत्रण रेषेचा आढावा घेण्यात आला आहे, त्यामुळे काही तरी मोठं घडणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारच्या या निर्णयांमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.