सोन्याचे दागिने चोरले आणि चोराला आली झोप,मग त्या घरातील फरशीवरच चोराने दिली ताणून, नंतर जे घडले…
एका चोराने घरात शिरुन मोठा डल्ला मारला आणि दागदागिने चोरी केल्यानंतर त्याला प्रचंड झोप आली. त्यामुळे त्याने त्या घरातच फरशीवर मस्तपैकी ताणून दिली. मात्र,सकाळ होताच घरातील माणसे बाहेर गावाहून परतली आणि त्यांना धक्काच बसला...

हैदराबाद येथे चोरीची एक अशी घटना घडली आहे ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे चोरीच्या उद्देश्याने घरात घुसलेल्या चोराने दागिने चोरले आणि तो चोर पळून जाण्याच्या ऐवजी घरातच झोपल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. या बंद घरातील लोक जेव्हा बाहेर गावावरु परत आले तेव्हा त्यांना घरात एक व्यक्ती लादीवर झोपलेला आढळला. त्यांनी घरात तपासणी केली तर कपाटाचे दार आणि लॉकर उघडलेले दिसले.
हा प्रकार हैदराबाद येथील पडाडी शरीफ भागात घडले आहे. वाडी-ए-मुस्तफा भागातील ही घटना सांगितली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण कथितपणे चोरी करण्याच्या उद्देश्याने या घरात शिरला होता. घरात शिरल्यानंतर त्याने कथितरित्या सोन्याचे दागिने चोरले. मात्र यानंतर तो घरातून पळून जाणार इतक्यात त्याला झोप आली. तो घरातच फरशीवर झोपला. दुसरीकडे घरातील लोक बाहेर गावावरुन आले, तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या घरात कोणी शिरले आहे. जेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना धक्का बसला. अनोळखी व्यक्ती घरातील लादीवर झोपला होता. तर घरातील कपाट उघडे होते आणि घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलले होते. आणि फरशी वरील अनोळखी व्यक्ती मात्र आरामात घोरत होता.
कुटुंबियांनी या तरुणाला पाहिले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी या तरुणाच्या जवळ जावून त्याची पाहणी केली असता त्याच्याकडे चोरी केलेले सोन्याचे दागिने होते. यानंतर या कुटुंबाने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर पोलिसांना कॉल केला. पहाडी शरीफ ठाणे पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या झोपलेल्या तरुणला ताब्यात घेतले आणि चोरलेले दागिने जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच भागात राहणार आहे. जेव्हा तो घरात आला तेव्हा तो नशेमध्ये होता. त्यामुळे त्याला झोप आली आणि तो तेथेच झोपला. या चोराने गांजा सारखा नशेचा पदार्थ घेतला असल्याने त्याला झोप आली आणि तो पळून जायच्या ऐवजी घरातच झोपला.या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या चोराने आधीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचा तपास केला जात आहे.