
लखनऊ | 8 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचं पाणीपाणी झालं आहे. एका तरुणाला आपल्या बहिणीचा मृतदेह बाईकवरून न्यावा लागला आहे. बहिणीचा मृतदेह ओढणीने पाठीला बांधला आणि तो मृत बहिणीला घेऊन गेला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. तर अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं आहे. वैऱ्यावरही अशी वेळ येऊ नये अशी भावना या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाची थेट राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी दखल घेतली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील बिधुना नगरच्या किशनी रोडवरील एका वस्तीतील ही घटना आहे. 19 वर्षीय अंजलीला शॉक लागल्याने ती बेशुद्ध पडली होती. त्यामुळे घरातील लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. मात्र, अंजलीच्या कुटुंबीयांना तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करायचं नव्हतं. त्यामुळे ते तिचा मृतदेह घेऊन गेल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
अंजलीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह डॉक्टरांना न सांगताच सोबत नेला. बाईकवर बॉडी ठेवून ते घेऊन गेल्याचं आम्हाला समजलं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर, अंजलीची आई आणि इतर नातेवाईकांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही आमच्या मर्जीने अंजलीचा मृतदेह घेऊन गेल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, काही लोकांनी वेगळेच आरोप केले आहेत. आरोग्य विभागाचा हा निष्काळजीपणा असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. रुग्णालयाने मृताच्या कुटुंबीयांना रुग्णवाहिका द्यायला हवी होती. त्यांनी दिली नाही. त्यामुळे मृताचे कुटुंबीय मृतदेह बाईकवरून घेऊन गेले आहेत, असं काही लोकांचं म्हणणं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून त्यातून सत्य बाहेर येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या व्हिडीओत एक तरूण त्याच्या मृत बहिणीला बाईकवरून नेताना दिसत आहे. हा तरुण बाईकवर बसलाय. त्याच्यामागे त्याची मृत बहीण आहे. आणि तिच्या पाठी एक महिला आहे. या तरुणाच्या पाठिला त्याच्या बहिणीला ओढणीने बांधण्यात आलं आहे. बहिणीचा मृतदेह तसाच पाठीला बांधून तो बाईक चालवत असून बाईक चालवताना धायमोकलून रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक दु:ख व्यक्त करताना दिसत आहे