
पाकिस्तान सध्या प्रचंड तणावाखाली आहे, भारताने आधीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांचं टेन्शन वाढवलं आहे. त्यातच आता पाकिस्तान आपल्या कारनाम्यांमुळे इस्रायलच्या निशाण्यावर आला आहे. पाकिस्तानला अशी भीती वाटत आहे, की इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतात, तशी प्लानिंग इस्रायलमध्ये सुरू आहे. पाकिस्तानचे पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नजम शेठी यांनी देखील या संदर्भात पाकिस्तानला इशारा दिला आहे. इस्रायल पाकिस्तानवर दबाव निर्माण करू शकतो. नेतन्याहू अनेक कारणांमुळे पाकिस्तानवर नाराज आहेत. नेतन्याहू यांच्या नाराजीचं सर्वात मोठं कारण म्हणजे अलिकडेच पाकिस्तानचं वाढलेलं हमास प्रेम हे आहे. त्यामुळे इस्रायल पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, असं नजम शेठी यांनी म्हटलं आहे.
इस्रायलने आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे, जगातील कोणत्याही मुस्लिम देशाकडे अण्वस्त्र नसावीत असं इस्रायलनं म्हटलं आहे. मात्र इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अशी शंका आहे की, पाकिस्तान हा अण्वस्त्र तंत्रज्ञानासाठी इराणची मदत करत आहेत. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तर शिगेला पोहोचला आहे, त्यामुळे जर पाकिस्तानने इराणला कोणत्याही प्रकारची मदत केली तर इस्रायल कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पाकिस्तामध्ये असलेल्या दहशतवादी संघटना लष्कर -ए तैयबा आणि जैश ये मोहम्मद सारख्या संघटनांमध्ये आता हमासची उपस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे. मिडल इस्ट मीडियाच्या एका रिपोर्टनुसार हमासचा टॉप कमांडर नाजी जहीर याने अनेकदा पाकिस्तानचा दौरा केला आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना नाजी जहीर याला त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देखील बोलावतात, त्यामुळे इस्रायल हे पाकिस्तानवर हल्ला करू शकते. इस्रायलने यापूर्वी देखील पाकिस्तानला इशारा दिला आहे. मात्र आता हमासच्या मुद्द्यावर इस्रायल अधिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे आता पाकिस्तानची चिंता वाढली असून, इस्रायल आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव पहायला मिळू शकतो.