
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रान्स दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर (ITER) च्या स्थळाला भेट देणे, ही गोष्ट भारताची अणुऊर्जेच्या क्षेत्रातील महत्वाची भूमिका जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखीत करते . आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर (ITER) हा एक वैज्ञानिक सहकार्याचा उपक्रम आहे, जो जागतिक ऊर्जा प्रणालीमध्ये क्रांती घडवण्यासाठी काम करीत आहे, भारत त्यात एक महत्त्वाचा भागीदार म्हणून कार्यरत आहे.
भारतात अणुऊर्जा क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे, ज्यामध्ये २०१४ मध्ये ४,७८० मेगावॉट एवढी क्षमता होती. तर २०२४ मध्ये ही ऊर्जा क्षमता ८,१८० मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे त्यामध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. भविष्यात, भारताने २०३१-३२ पर्यंत २२,४८० मेगावॉट क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारत अणुऊर्जेचा उपयोग इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही करत आहे. कृषी क्षेत्रात अणू तंत्रज्ञानाचा उपयोग करून ७० म्युटेजनिक पीक वाण विकसित करण्यात आली आहेत. आरोग्य क्षेत्रात अणू इसोटोप्सच्या साहाय्याने कर्करोग उपचारासाठी अधिक अचूक आणि प्रभावी उपाय शोधण्यात आले आहेत. संरक्षण क्षेत्रातही अणुऊर्जेचे उपयोग अनेक बाबींमध्ये झाला आहे, जसे की किफायतशीर, हलक्या बुलेटप्रूफ जॅकेट्सच्या निर्मितीसाठी त्याचा उपयोग करण्यात आला आहे.
भारताकडे थेरियमचा प्रचंडसाठा आहे. थेरियमच्या एकूण जागतिक साठ्यापैकी सुमारे 21 टक्के साठा हा भारताकडे आहे. त्यामुळे अणुऊर्जा क्षेत्रात येणाऱ्या काळात भारत हा जगाचं नेतृत्व करणार आहे.
जागतिक शांती आणि सुरक्षित अणुऊर्जा क्षेत्रासाठी भारताची बांधिलकी
भारत नेहमीच अणू अप्रसार आणि शांततामय अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या वापराचे समर्थन करत आला आहे. एक उत्तरदायी अणुऊर्जा शक्ती म्हणून, भारत आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतो, ज्यात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) च्या देखरेखीचे पालन आणि जागतिक स्तरावर निशस्त्रिकरणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. भारताने निशस्त्रिकरण परिषद (CD) आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) यांसारख्या व्यासपीठावर सक्रियपणे सहभाग घेतला आहे, आणि उत्तरदायी अणुऊर्जा शासनासाठी प्रयत्न केले आहेत.
विकसित भारतासाठी अणुऊर्जा मिशन अंतर्गत, २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात लहान मॉड्यूलर रिअॅक्टर (SMRs) संशोधन आणि विकासासाठी तब्बल २०,००० कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही मोठी गुंतवणूक भारताच्या शांततामय अणुऊर्जा अनुप्रयोगांच्या प्रति बांधिलकीचे प्रतिबिंब आहे, यामुळे सुरक्षित आणि टिकाऊ अणुऊर्जा क्षेत्रात एक अग्रणी देश म्हणून भारताचे स्थान मजबूत होणार आहे. २०३३ पर्यंत किमान पाच स्वदेशी SMRs डिझाईन विकसित आणि कार्यान्वित करण्याचे भारताचे लक्ष्य आहे, भारत ऊर्जा संरचनेला मजबूत करत आहे आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी योगदान देत आहे. अणुऊर्जा कायदा आणि अणू हानीसाठी नागरी जबाबदारी कायदा यामध्ये केलेले विधीमंडळ बदल, गुंतवणुकीसाठी अनुकूल व्यासपीठ तयार करणे, आंतरराष्ट्रीय भागीदारीला चालना देणे आणि अणुऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञानात प्रगती करणे असा यामागचा हेतू आहे.
अणुऊर्जा नवकल्पनांसाठी सार्वजनिक-खाजगी सहकार्य
भारत अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे महत्त्व ओळखतो. सहकार्याच्या माध्यमातून सरकार नवकल्पना प्रोत्साहित करत आहे, विकेंद्रीकरणासाठी आणि लहान रिअॅक्टर्सच्या निर्मितीसाठी तसेच सुरक्षित, कार्यक्षम अणुऊर्जा उपायांसाठी भारत अणुऊर्जा तंत्रज्ञानावर काम करत आहे. एवढंच नाही तर अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी उद्योगांचा समावेश करून, भारत नाविन्यता, कार्यक्षमता आणि सुरक्षा सुधारण्याचा आणि शांततामय अणुऊर्जा क्षेत्रातील जागतिक स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विकास
भारत आणि फ्रान्स यांच्यात नागरी अणुऊर्जा क्षेत्रात एक मजबूत आणि दीर्घकालीन भागीदारी आहे, ज्याचं प्रमुख प्रतीक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. हा महत्वाकांक्षी भारत-फ्रान्स सहकार्य प्रकल्प जागतिक अणुऊर्जा स्थळी सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प होईल, जो जवळपास १० गिगावॉट विद्युत निर्मिती करेल. दोन्ही देशांचं या प्रकल्पासाठी असलेलं समर्पण आणि समस्या सोडविण्याची तयारी, दोन्ही देशांच्या एकत्रित प्रयत्नांची दृढता दर्शवते. तसेच, भारताने अणुऊर्जा दायित्वावर केलेले नवीन कायदे व बदल, आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या अणुऊर्जा प्रकल्पांबाबत विश्वास निर्माण करतात, आणि भारताच्या उत्तरदायी आणि प्रगतीशील जागतिक नेतृत्वाच्या भूमिकेला बळ देतात.
आगामी काळात, भारत आणि फ्रान्स हे पारंपारिक अणुऊर्जा प्रकल्पांच्या बाहेर, जसे की SMRs आणि AMRs यांसारख्या अत्याधुनिक रिअॅक्टर्सच्या तंत्रज्ञानांवर संयुक्तपणे काम करणार आहेत. हे प्रगत रिअॅक्टर्स अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि टिकाऊ असतील, ज्यामुळे जागतिक अणुऊर्जेचं भविष्य अधिक स्वच्छ आणि सुरक्षित होईल.
भारताची ITER मध्ये भूमिका: फ्यूजन ऊर्जा निर्माण
भारत आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर एक्सपेरिमेंटल रिअॅक्टर (ITER) प्रकल्पात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जो कदारेच, फ्रान्स येथे स्थित एक बहुराष्ट्रीय उपक्रम आहे, जो अणू फ्यूजनला एक असीमित स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ITER-India मार्फत भारत महत्त्वाचे घटक पुरवत आहे, जसे की क्रायोस्टेट, कूलिंग वॉटर सिस्टम आणि RF हिटिंग सिस्टिम्स, ज्यामुळे त्याची अणुऊर्जा तंत्रज्ञानातील कौशल्ये प्रदर्शित होत आहेत.
भारतीय खाजगी उद्योग, ज्यामध्ये लार्सन अँड टुब्रो (L&T) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे, टोकामाक रिअॅक्टरसाठी अत्याधुनिक वेल्डिंग आणि तंत्रज्ञान पुरवत आहेत, यातून भारताचे फ्यूजन ऊर्जा संशोधनातील योगदान दिसून येत आहे. ITER प्रकल्पात भारताचे जागतिक स्थरावर 9 टक्के योगदान आहे.
जागतिक अणुऊर्जा शांती आणि सुरक्षा साध्य करण्यासाठी रोडमॅप
भारताने २०४७ पर्यंत १०० गिगावॉट अणुऊर्जा क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, भारत जागतिक शांती आणि उत्तरदायी अणुऊर्जा वापराच्या प्रति आपली बांधिलकी वृद्धिंगत करत आहे. भारत आणि फ्रान्समधील अणुऊर्जा भागीदारी हे दाखवते की देश एकत्र येऊन अणुऊर्जा साधनाचा समर्पकपणे उपयोग करू शकतात. ज्यामुळे एक सुरक्षित, स्वच्छ आणि टिकाऊ जग निर्माण होईल.