
अमेरिकेसोबत सुरु असलेल्या ट्रेड डीलवर भारताच स्टेटमेंट समोर आलय. ‘भारत आणि अमेरिकेत फ्री ट्रेड एग्रीमेंटवरुन सतत चर्चा सुरु आहेत. आता दोन्ही देश सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत’ असं व्यापार आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल बुधवारी म्हणाले. त्याचवेळी पीयूष गोयल यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की, भारत आपल्या प्रमुख व्यापारी भागीदारांसोबत नव्या शक्यता शोधत आहे. त्या दिशेने ठोस पावलं उचलत आहे. त्याआधी मंगळवारी अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “व्यापारातील बाधा दूर करण्यासाठी भारत आणि अमेरिकेत चर्चा सुरु आहेत. लवकरच तोडगा निघेल. मी पुढच्या काही दिवसात माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास उत्सुक आहे” त्यावर पंतप्रधान मोदी सुद्धा म्हणाले की, “मी सुद्धा राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि अमेरिका चांगले मित्र आहेत”
टॅरिफ टेन्शनच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे सर्वोच्च नेते परस्परांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. बुधवारी पीयूष गोयल फिक्कीच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ‘भारत आणि अमेरिकेत FTA वरुन सुरु असलेली चर्चा योग्य दिशेने जात आहेत’ ते म्हणाले की, ‘भारत आणि अमेरिकेत व्यापारी संबंध आधीपासून मजबूत आहेत. आता ते अधिक व्यापक करण्यावर भर दिला जात आहे’ सोबतच केंद्रीय मंत्री म्हणाले की, ‘व्यापार करारासाठी अमेरिकेशिवाय न्यूझीलंडसोबत सुद्धा सक्रीय चर्चा सुरु आहे’
आतापर्यंत कुठल्या देशांसोबत करार झालेत?
पीयूष गोयल म्हणाले की, “भारत आणि युरोपियन संघात FTA वर चर्चा सुरु आहे. युरोपियन यूनियन भारताची एक मोठी निर्यात बाजारपेठ आहे. न्यूझीलंडसोबत संभाव्य करारामुळे कृषी आणि डेअरी सेक्टरसाठी नवीन संधीचे दरवाजे उघडले जाऊ शकतात” भारताने आतापर्यंत मॉरीशेस, संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि ऑस्ट्रेलियासोबत व्यापार करार केला आहे. त्याशिवाय ब्रिटेनसोबतही FTA करार झाला आहे. हे करार भारतीय निर्यातदारांना नवीन बाजारात संधी मिळवून देणार आहेत. खासकरुन UAE सोबतच्या व्यापक आर्थिक भागीदारीमुळे (CEPA)खाड़ी देशात भारताच्या व्यापाराला नवीन वेग दिला आहे.अमेरिकेने अचानक टॅरिफ वाढवून निर्माण केलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने बहुपक्षीय व्यापार रणनीतीवर काम करावं असा एक्सपर्ट्चा सल्ला आहे. म्हणजे एकट्या अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही.