Bangladesh Crisis : हिंदुंची सुरक्षा, बांग्लादेशातील परिस्थितीवर एस. जयशंकर यांची संसदेत महत्त्वाची माहिती

Bangladesh Crisis : "सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांशी बैठक केल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खूप कमी वेळात भारतात येण्याची परवानगी मागितली. काल संध्याकाळी त्या दिल्लीत पोहोचल्या" असं जयशंकर म्हणाले.

Bangladesh Crisis : हिंदुंची सुरक्षा, बांग्लादेशातील परिस्थितीवर एस. जयशंकर यांची संसदेत महत्त्वाची माहिती
Foreign Minister S Jaishankar
| Updated on: Aug 06, 2024 | 3:46 PM

काल दुपारपासून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. शेजारच्या बांग्लादेशात सरकार कोसळलं. शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पळाव लागलं. शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत. सध्या त्या उत्तर प्रदेशातील हिंडन एअर बेसवर गेस्ट हाऊसमध्ये आहेत. बांग्लादेशातील स्थिती नाजूक आहे. तिथे भारतविरोधी शक्ती सत्तेवर येऊ शकतात. सत्ता बदल होताच बांग्लादेशात हिंदुंना टार्गेट केलं जातय. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत महत्त्वाच निवेदन दिलं.

“बांग्लादेशात जुलै महिन्यापासून हिंसाचार सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हिंसाचार सुरु झाला. शेख हसीना यांना सत्तेतून हटवणं हा आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता. शेख हसीना यांनी भारतात काहीवेळ थांबू देण्याची विनंती केली” अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितलं की, “भारत सरकार आर्मी चीफच्या संपर्कात आहे. आता तिथे जे सरकार सत्तेवर आहे ते भारतीय उच्चायोग आणि आमच्या लोकांना सुरक्षा प्रदान करतील”

बॉर्डरबद्दल जयशंकर काय म्हणाले?

“सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांशी बैठक केल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खूप कमी वेळात भारतात येण्याची परवानगी मागितली. काल संध्याकाळी त्या दिल्लीत पोहोचल्या” असं जयशंकर म्हणाले. बांग्लादेशात अल्पसंख्यांकावर जे हल्ले होतायत, त्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. “बांग्लादेशच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालय. आम्ही स्थिती सामान्य होण्याची अपेक्षा करतोय. बॉर्डरवर BSF ची करडी नजर आहे” जयशंकर यांनी सांगितलं.


बांग्लादेशात किती हजार भारतीय?

“बांग्लादेशात 18 हजारच्या आसपास भारतीय आहेत. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. तिथे 12 ते 13 हजार लोक अजूनही आहेत. हिंदुंच्या मंदिरांवर, घरांवर बांग्लादेशात हल्ले सुरु आहेत. हे चिंताजनक आहे. आम्ही ढाका प्रशासनाच्या संपर्कात आहोत. राजदूत आणि हिंदुंची सुरक्षा सुनिश्चित करायला सांगितली आहे” असं जयशंकर म्हणाले.