
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आला. येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर अशी चिंता व्यक्त केली जात होती की, त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. मात्र आता या सर्व शक्यतांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
जुलै महिन्यात भारताच्या बेरोजगारी दरात मोठी घट झाली आहे. भारताचा बेरोजगारी दर कमी होऊन 5.2 वर पोहोचला आहे. पूर्वी तो 5.6 टक्के एवढा होता. ग्रामीण भागांमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तरुणांचा बेरोजगारी दर कमी होऊन 4.4 वर पोहोचला आहे, त्यापूर्वी ते 4.9 टक्के इतका होता. हा बेरोजगारी रेट कमी होण्यामागे शेतात सध्या सुरू असलेली कामं मानली जात आहेत. पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना शेतात मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.
शहरी भागात मात्र थोडं उलटं चित्र पहायला मिळत आहे, शहरी भागामध्ये बेरोजगारीच्या दरात थोडी वाढ झाली आहे, जून महिन्यामध्ये भारतातील शहरी भागातील बेरोजगारी दर हा 7.1 टक्के एवढा होता, मात्र तो जुलै महिन्यात वाढून 7.2 टक्के एवढा झाला आहे. सरासरीचा विचार केल्यास भारतातील बेरोजगारीचा दर हा 5.6 टक्क्याहून कमी होऊन 5.2 वर पोहोचला आहे. ही भारतासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
भारताकडून नुकतीच जीएसटी रिफॉर्म करण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्याचा देखील सकारात्मक परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. यामुळे आणखी काही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊन बेरोजगारीचा दर हा कमी होऊ शकतो. एकीकडे अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या टॅरिफमुळे चिंता व्यक्त केली जात होती, मात्र त्यातच आता ही दिलासादायक बातमी समोर आली आहे, येत्या काळात हा दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.