Neelam Shinde : कराडच्या लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज, इथे वडिलांचा व्हिसासाठी संघर्ष

Neelam Shinde : सध्या निलमची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना माहिती मिळत आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या कराडच्या मुलीचा तिथे भीषण अपघात झाला.

Neelam Shinde : कराडच्या लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज, इथे वडिलांचा व्हिसासाठी संघर्ष
Neelam Shinde
| Updated on: Feb 27, 2025 | 4:05 PM

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज सुरू आहे. पण तिच्या पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीय. सातारा कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या निलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत 11 दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मरणाच्या दारात असणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना व्हिजा मिळत नाहीय. निलम हीचा 14 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेत व्यायामासाठी चालताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघाताला दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र, रक्ताचे नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचे अमेरिकेतील पोलिस सांगतायत. अपघातात निलमच्या डोक्याला आणि दोन्ही हाता, पायांना आणि दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.

सध्या तिथे कोण आहे?

सध्या निलमची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना माहिती मिळत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून व्हिसासाठी संपर्क केला. मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा ऑफिसला पालक गेले तरीही दाद मिळेना. आमची व्यथा चॅनलच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी व आम्हाला लवकरात लवकर व्हिसा मिळावा अशी विनंती मामा, वडिलांनी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून दखल

निलम शिंदेच्या अपघात प्रकरणात आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दखल घेतली आहे. निलम शिंदे यांच्या वडिलांना लवकर व्हिजा मिळावा, यासाठी परराष्ट्र खात्याने अमेरिकन सरकारला विनंती केली आहे. या अपघाताची बातमी मिळाल्यानंतर निलमच्या कुटुंबियांना तात्काळ अमेरिकेला रवाना व्हायचे आहे, यासाठी त्यांनी व्हिसा मिळावा म्हणून अर्ज केला आहे. हा अर्ज मंजूर व्हावा, अशी तिच्या कुटुंबियांनी विनंती केली असून या विनंतीची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी केली आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून विनंती

निलमचे वडील तानाजी शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विनंती केली आहे. 16 फेब्रुवारी पासून आम्ही व्हिसा मिळावा म्हणून प्रयत्न करत आहोत. पण अद्याप आम्हाला व्हिसा मिळालेला नाही असं त्यांनी सांगितलं.