
Indigo Plane Emergency Landing : गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची घटना ताजी आहे. या विमान अपघातात एक प्रवासी वगळता सर्वच्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या धक्क्यातून अजून देश निघालेला नसताना आता भारतात अशीच एक दुर्घटना होता-होता राहिली. पायलटने दाखवलेल्या तत्परतेमुळे ही दुर्घटना टळली. इंडिगो कंपनीच्या विमानसोसबत हा प्रसंग घडला आहे. हे विमान गुवाहाटीहून चेन्नईला जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो कंपनीच्या विमानाला बंगळुरूमध्ये इमर्नजन्सी लँडिंग करावी लागली. हे विमान गुवाहाटीहून चेन्नईला जाणार होते. मात्र मध्ये विमान चालकाला आपल्या विमानात इंधन कमी आहे, असे समजले. त्यामुळे त्याने तत्काळ Mayday हा इमर्जन्सी मेसेज पाठवला. त्यानंतर या विमानाने तत्काळ बंगळुरू येथे इमर्जन्सी लँडिंग केली ही घटना गुरुवारी घडली. पण या घटनेबाबत आता शनिवारी माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो कंपनीच्या या विमानात एकूण 168 प्रवासी होते. 19 जूनच्या रात्री 8.15 वाजता या विमानाने बंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग केलं. विमानाच्या दोन्ही पायलटना रोस्टवरून हटवण्यात आलं आहे. या विमानाने रात्री साधारण 7.45 वाजता चेन्नईच्या विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर हे लँडिंग रद्द करण्यात आले आणि नंतर हे विमान पुढे बंगळुरूच्या दिशेने निघाले. बंगळुरू विमानतळावर उतरण्याच्या 35 मिनिटे अगोदर पायलटने इमर्जन्सी असल्याची सूचना दिली होती.
इमर्जन्सीचा संदेश मिळताच हवाई वाहतूक नियंत्रण विभाग, अग्निशन दल, आरोग्य सेवा यांना तयार ठेवण्यात आलं होतं. हे विमान नंतर 8.15 वाजता सुरक्षितपणे विमानतळावर उतरलं. यावेळी कोणतीही दुर्घटना झालेली नाही. दरम्यान, याआधी 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातात 242 लोक प्रवास करत होते. यातील फक्त एक प्रवासी वगळता सर्वच्या सर्व म्हणजेच 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला.