तो एक क्षण, 35 मृत्यू; इंदौरची विहीर ठरली मौत का कुआं!

| Updated on: Mar 31, 2023 | 12:43 PM

इंदौरचे विभागीय आयुक्त पवन शर्मा यांनी या घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. अजूनही येथील बचावकार्य सुरुच आहे.

तो एक क्षण, 35 मृत्यू; इंदौरची विहीर ठरली मौत का कुआं!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

इंदौर (मध्य प्रदेश): रामनवमीच्या (Ramnavami) उत्सव सुरु असताना इंदौरमध्ये (Indore) घडलेल्या घटनेने अवघा देशात हळहळ व्यक्त होतेय. गुरुवारी इंदौरमधील झुलेलाल मंदिरात भाविक राम जन्मोत्सवासाठी जमले होते. सकाळी 11.55ची वेळ. मंदिरात राम जन्मोत्सवाचा क्षण जवळ आला होता. भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. अचानक सगळ्यांच्याच पायाखालची जमीन धसली. भाविक जिथे उभे होते, तिथे एक जुनी विहीर होती. त्यावर सिमेंटचं झाकण टाकलं होतं. हे झाकण धसलं आणि तिथे उभे असलेले सगळेच थेट  50 फूट खोल विहिरीत पडले. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत बचावकार्य सुरूच आहे. या भीषण घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झालाय.

15 वर्षांपूर्वी झाकली होती विहीर..

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की इंदौरमधील हे मंदिर जवळपास ६० वर्षांपूर्वीचं आहे. जवळपास १५ वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला, तेव्हा विहिरीवर झाकण सिमेंटचं अच्छादन टाकलं गेलं.  पण काल राम जन्मोत्सवाचा उत्सव चालू असताना अचानक असं काही घडेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. कालच्या घटनेवेळी मंदिरात जवळपास ४० ते ५० भाविक होते. राम जन्मोत्सवात आरतीच्या प्रतीक्षेत सगळे असतानाच अचानक सर्वांच्याच पायाखालची जमीन धसली. इथे उभे असलेले सगळेच खोल विहिरीत पडले.

पंतप्रधान निधीतून आर्थिक मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केली.

35 मृत्यू, बचावकार्य सुरूच

इंदौरचे विभागीय आयुक्त पवन शर्मा यांनी या घटनेत आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. अजूनही येथील बचावकार्य सुरुच आहे. विहिरीत पाणी असल्याने लोकांना बाहेर काढण्यात अडथळे निर्माण होत होते. आता पंपाद्वारे हे पाणी काढून टाकण्यात आले आहे.

छत पडल्यानंतर विहिरीत पडलेले भाविक कडांना लागलेल्या पायऱ्या, शिडीवर चढून बसले होते. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेत आतापर्यंत 18 जणांचे प्राण वाचवण्यात बचावपथकाला यश आलंय. तर 35 जणांचा मृत्यू झाला. इंदोरमधील या विहिरीतील बचावकार्यासाठी एनडीआरएफचे 15, एसडीआरएफचे 50 आणि आर्मीचे 75 जवान शामिल आहेत.