
बंगळुरु : भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं. आात ‘प्रज्ञान’ रोव्हरने आपलं काम सुरु केलय. भारतीयांना या ऐतिहासिक क्षणांची अनुभूती देणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांना आज प्रत्येक भारतीय मनापासून सलाम करतोय. पण तुम्हाला माहित आहे का? इस्रोच्या वैज्ञानिकांना किती वेतन मिळतं? इस्रोपेक्षा नासाच्या वैज्ञानिकांना जास्त सॅलरी मिळते का? या मागच सत्य माजी चेअरमन जी. माधवन नायर यांनी सर्वांसमोर मांडलं.
किती वेतन मिळत?
“आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला. विकसित देशांच्या तुलनेत ISRO च्या वैज्ञानिकांचा पगार पाचपट कमी असताना हे शक्य झालय” असं जी. माधवन नायर यांनी सांगितलं. “वैज्ञानिकांचा कमी पगार यामुळे सुद्धा आपण प्रत्येक सॉल्यूशन कमी पैशात करण्याचा विचार करतो” असं त्यांनी सांगितलं. आज विकसित देशांच्या स्पेस सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांना जितका पगार मिळतो, त्यापेक्षा कमी वेतन इस्रोच्या वैज्ञानिकांना मिळते.
इस्रोमध्ये किती लखपती?
“तुम्हाला इथे कोणी लखपती मिळणार नाही. प्रत्येक जण सामान्य आयुष्य जगतोय. कोण पैशाबद्दल विचारही करत नाही. कारण प्रत्येकाला आपल्या देशासाठी योगदान द्यायच आहे. आम्ही आमच्या चूकांपासून शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही स्वदेशी गोष्टींचा मिशनमध्ये उपयोग करतोय. त्यामुळे बजेट नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होते” असं इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी सांगितलं.
बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांच इतकं बजेट
भारताने चांद्रयान-3 मिशनच्या माध्यमातून नवीन इतिहास रचला आहे. या मिशनच एकूण बजेट 615 कोटी रुपये होतं. सध्याच्या जमान्यात अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सिनेमांच इतकं बजेट असतं. मात्र इतक्या कमी बजेटमध्ये भारताने इतिहास रचला. अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील चौथा देश ठरला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चांद्रभूमीवर उतरलं.