
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरमधील काही टुरिस्ट प्लेस खासकरुन हॉटेल्सची रेकी केली होती. सुरक्षा यंत्रणांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. काश्मीरच्या या टुरिस्ट प्लेसमध्ये पहलगाममधील काही हॉटेल्सही होती. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबावर सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. 1 ते 7 एप्रिल दरम्यान ही रेकी झाली होती. केंद्रीय एजन्सीजनुसार, तीन पेक्षा जास्त दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा 30 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यात दोन परदेशी नागरिकांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. एक इस्रायली आणि दुसरी इटलीचा नागरिक आहे. अजूनपर्यंत याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या भयानक हल्ल्यानंतर पर्यटकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी इमर्जन्सी हेल्प डेस्क बनवण्यात आला आहे. पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी 9596777669, 01932225870 (9419051940 हे व्हॉट्सएप) नंबर देण्यात आले आहेत.
अमित शाह श्रीनगरमध्ये
NIA टीम उद्या पहलगाम येथे पोहोचू शकते. त्याशिवाय लष्कर प्रमुखही उद्या जम्मू-काश्मीरला जाऊ शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या श्रीनगरमध्ये आहेत. बुधवारी ते घटनास्थळाला भेट देऊ शकतात. आता अमित शाह यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा सुद्धा आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा केली आहे.
पर्यटकांवर हल्ला करणं खूप भयानक आणि अक्षम्य
“जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला वेदनादायी आहे. हे एक नृशंस आणि अमानवीय कृत्य आहे. याचा स्पष्टपणे निषेध केला पाहिजे. निर्दोष नागरिक, पर्यटकांवर हल्ला करणं खूप भयानक आणि अक्षम्य आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना या हल्ल्यात गमावलं आहे, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे” असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
आमच्या जवानांच रक्त खवळलं आहे
या हल्ल्यामागील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सर्च ऑपेरशन सुरु झाल्याच उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या ऑफिसकडून सांगण्यात आलं. “संपूर्ण देशात राग आहे, आमच्या जवानांच रक्त खवळलं आहे. पहलगामच्या हल्लेखोरांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल. यावेळी शोकसागरात बुडालेल्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे” असं मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.