वय वर्ष ८० तरी कर्नाटकच्या राजकारणाचं चित्र बदलवण्याची ताकद, भाजपचा सर्वात मोठा चेहरा

| Updated on: Mar 06, 2023 | 3:46 PM

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी रणनीती आखत आहे. पण माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशिवाय भाजपला पर्याय नसल्याचं दिसत आहे.

वय वर्ष ८० तरी कर्नाटकच्या राजकारणाचं चित्र बदलवण्याची ताकद, भाजपचा सर्वात मोठा चेहरा
भाजप नेते येडियुरेप्पा
Follow us on

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा हे कर्नाटकच्या राजकारणातील आजही सर्वात मोठा चेहरा आहे. येडियुरप्पा 80 वर्षांचे झाले असले तरी देखील त्यांच्या शिवाय भाजपचं कर्नाटकात पान हालू शकत नाही. कर्नाटकात सरकार हवं असेल तर भाजपकडे येदियुरप्पा यांच्याशिवाय पर्याय नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तेच भाजपचे सर्वात मोठे प्रचारक असतील. त्यांचं वजन कर्नाटकच्या राजकारणात कायम आहे.

कर्नाटकात लिंगायत समुदायावर मजबूत पकड असणारे येडियुरप्पा यांना जुलै 2021 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यांच्या जागी बसवराज बोम्मी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. तेव्हापासून येडियुरप्पा यांचे समर्थक नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

पीएम मोदींसोबत जवळचे संबंध

भाजपच्या इतर नेत्यांसोबत त्यांचं खास नातं नसलं तरी देखील ते पंतप्रधान मोदी यांचे जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध खूप खास आहेत. कर्नाटक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांना झुकून नमस्कार केला होता. त्यांचे कौतूक केले होते. पीएम मोदी यांना देखील कर्नाटकमध्ये येडियुरप्पा यांच्या राजकीय प्रभाव काय आहे हे माहित आहे.

४ वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री

येडियुरप्पा हे चार वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र, ते कधीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. 12 नोव्हेंबर 2007 रोजी ते मुख्यमंत्री झाले. मात्र, सात दिवसांनी त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर ते 2008, 2018 आणि 2019 मध्येही मुख्यमंत्री झाले, मात्र प्रत्येक वेळी त्यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा सध्या भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी अलीकडेच सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती.

तळागाळातील चेहरा

80 वर्षीय बीएस येडियुरप्पा हे कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या सर्वात वरच्या नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात तळागाळात भाजपची बांधणी करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. येडियुरप्पा यांना अनेक समाजाचा वेगळा पाठिंबा आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. येडियुरप्पांशिवाय निवडणूक लढवली तर भाजपला फटका लागू शकतो. कारण स्थानिक पातळीवर लोकं पक्षापेक्षा नेत्यावर अधिक विश्वास ठेवतात. अशा स्थितीत भाजपला येडियुरप्पा यांना वगळून चालणार नाही.

मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका

मे महिन्यात कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे, मात्र यावेळी आम आदमी पक्षाच्या प्रवेशाने निवडणूक रंजक बनली आहे. काँग्रेसचीही वाटचाल संथगतीने सुरू आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आपले 80 वर्षीय दिग्गज नेते येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.