एक पेन ड्राइव्ह, 2976 व्हिडीओ… माजी पंतप्रधानाचा नातू सेक्स स्कँडलमध्ये; ऐन निवडणुकीत देशच हादरला

देशभरात निवडणुकीचं रण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मात्र, कर्नाटक सध्या वेगळ्याच कारणाने तापला आहे. तो म्हणजे एक सेक्स स्कँडल. माजी पंतप्रधानाच्या मुलाचं आणि नातवाचं हे प्रकरण आहे. हजारो व्हिडीओ आणि अनेक बायका या व्हिडीओत असल्याचं सांगितलं जातं. हे सर्व व्हिडीओ अश्लील असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

एक पेन ड्राइव्ह, 2976 व्हिडीओ... माजी पंतप्रधानाचा नातू सेक्स स्कँडलमध्ये; ऐन निवडणुकीत देशच हादरला
Prajwal Revanna
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 29, 2024 | 8:47 PM

देशात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वातावरण तापलेलं असतानाच एका सेक्स स्कँडलने संपूर्ण देशच हादरवून टाकला आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना वादात अडकला आहे. हा वाद काही किरकोळ नाहीये. प्रज्वलचे काही आपत्तीजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे सर्व अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओमुळे कर्नाटकातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या व्हिडीओमध्ये कथितरित्या प्रज्वल दिसत आहे. जनता दल सेक्युलरचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी या व्हिडीओद्वारे महिलांना ब्लॅकेमेल केल्याचा आणि त्यांचं शोषण केल्याचा आरोप केला जात आहे.

हे सर्व अश्लील व्हिडीओ 24 एप्रिल रोजी व्हायरल झाले आहेत. 26 एप्रिलला कर्नाटकात दुसऱ्या टप्प्याचं मतदान होतं. त्याच्या दोन दिवस आधीच हे व्हिडीओ व्हायरल करून जेडीएसला अडचणीत आणण्यात आलं आहे. एका 47 वर्षीय महिलेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून रेवन्ना यांच्या घरात काम करणारी मोलकरीण आहे. या महिलेने केवळ प्रज्वल रेवन्नाच नाही तर प्रज्वल यांचे वडील आणि होलेनरासीपूरचे आमदार एचडी रेवन्ना यांच्यावरही लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे.

चार महिन्यानंतर खोलीत बोलावलं…

या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यात अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. कामाला लागल्यानंतर चार महिन्यानंतर रेवन्ना यांनी तिला त्यांच्या खोलीत बोलावलं होतं. घरात एकूण सहा महिला कर्मचारी होत्या. या सर्व घाबरायच्या. जेव्हा प्रज्वल रेवन्ना घरी येतात तेव्हा या महिला अत्यंत घाबरतात. घरातील पुरुष स्टाफनेही महिला स्टाफला प्रज्वलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता, असं या महिलेचं म्हणणं आहे.

मोलकरणींना फळं द्यायचा

एचडी रेवन्ना यांची पत्नी घराच्या बाहेर जायची. तेव्हा ते घरातील महिला कर्मचाऱ्यांना स्टोअर रुममध्ये बोलावून त्यांना फळ द्यायचे. त्यानंतर त्यांना स्पर्श करायचे. त्यांच्या साडीची पिन हटवायचे. त्यांचं शारीरिक शोषण करायचे. प्रज्वल रेवन्ना यांनी आपल्या मुलीचीही छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रेवन्नाने आपला नंबर ब्लॉक केल्याचा खळबळजनक आरोपही या महिलेने केला आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे तक्रार

कर्नाटकाचे राज्य मंत्री प्रियांक खडगे यांनी या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार हासनच्या खासदाराने अनेकांशी दुर्व्यवहार केला आहे. हजारो पीडित आहेत. तरीही ते आघाडीत आल्यानंतर त्यांना तिकीट देण्यात आलं आहे, असं प्रियांक खडगे यांनी सांगितलं. दरम्यान, कर्नाटकातील भाजप नेते देवराज गौडा यांनी 8 डिसेंबर 2023 रोजी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी प्रज्वल रेवन्ना यांच्यासह एचडी देवेगौडा यांच्या कुटुंबातील सदस्यांवर अनेक गंभीर आरोप आहेत आणि आम्ही त्यांच्याशी युती केली आहे, असं म्हटलं होतं.

काँग्रेसच्या नेत्यांकडेही पेन ड्राईव्ह

मला एक पेनड्राइव्ह मिळाला आहे. त्यात एकूण 2976 व्हिडीओ आहेत. हे अश्लील व्हिडीओ आहेत. व्हिडीओत काही महिला दिसत आहेत. त्या सरकारी अधिकारी आहेत. या महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि त्यांचं लैंगिक शोषण करण्यासाठी या व्हिडीओचा वापर करण्यात आला आहे, असा दावा देवराज गौडा यांनी केला आहे. हे व्हिडीओ आणि फोटो असलेला आणखी एक पेन ड्राइव्ह काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचा दावाही देवराज यांनी केला आहे.

परदेशात गेले

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवन्ना हे रविवारी बेंगळुरूवरून जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे गेले आहेत. दरम्यान, रेवन्ना यांनी हा प्रकार म्हणजे एक षडयंत्र असल्याचा दावा करत आरोप फेटाळले होते. जे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ते चार ते पाच वर्षापूर्वीचे आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, व्हिडीओ मॉर्फ असल्याबद्दल त्यांनी काहीच भाष्य केलेलं नाही.