7 वर्षाच्या मुलाच्या जखमेतून रक्तस्त्राव, टाके घालण्याऐवजी लावलं Feviquick , नर्सच्या कारनाम्याने गदारोळ

कर्नाटकात सात वर्षांच्या मुलाला दुखापत झाली होती. त्याचे पालक त्याला सरकारी रुग्णालयात घेऊन गेले, जेथे नर्सने मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी तिथे फेविक्विक लावलं. कुटुंबीयांनी नर्सला जाब विचारला असता तिने आपण हे काम वर्षानुवर्षे करत असल्याचे उत्तर दिलं, यामुळे एकच गदारोळ झाला.

7 वर्षाच्या मुलाच्या जखमेतून रक्तस्त्राव, टाके घालण्याऐवजी लावलं Feviquick , नर्सच्या कारनाम्याने गदारोळ
टाके घालण्याऐवजी लावलं feviquick,नर्सच्या कारनाम्याने गदारोळ
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 06, 2025 | 11:45 AM

कर्नाटकमध्ये एक असा प्रकार घडला आहे, जे वाचून तुम्हीही डोक्याला हात मारून घ्याल, तुम्हाला धक्काच बसेल. सरकारी रुग्णालयात एक 7 वर्षांचा मुलगा आला होता, त्याला जखम झाली होती म्हणून तो उपचारांसाठी आला.मात्र तेथील नर्सने त्या मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी तेथे feviquick ( फेविक्विक) लावलं. तो अजब प्रकार पाहून त्या मुलाच्या कुटुंबियांनी नर्सला जाब विचारला असता, आपण वर्षानुवर्ष हे करत असल्याचं प्रत्युत्तर तिने दिलं. मात्र हा प्रकार उघडकीस येताच त्या नर्सला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 14 जानेवारी रोजी घडली. आपल्या सात वर्षांच्या मुलाला घेऊन काही लोकं हावेरीच्या हनागल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. त्या छोट्या मुलाच्या गालाला बरीच दुखापत झाली होती आणि बराच रक्तस्त्रावही होत होता. तेथे उपस्थित असलेल्या नर्सने त्याच्यावर लागलीच उपचार केले, मात्र त्या मुलाच्या जखमेवर टाके घालण्याऐवजी तिने तिथं चक्क फेव्हिक्विक लावलं. तिचा व्हिडीओही व्हायरल झाला. मी कित्येक वर्ष हेच करते, टाके लावल्यानं मुलाच्या चेहऱ्यावर खूण तशीच राहील त्यापेक्षा फेव्हिक्विक चांगले आहे , असं उत्तर तिने त्या मुलाच्या आई वडिलांनाही दिलं.

नातेवाईकांनी बनवला व्हिडीओ

यावेळी त्या मुलाच्या कुटुंबीयांनी नर्सचा व्हिडिओ बनवला. मी अनेक वर्षांपासून हे करत असून काळजी करण्यासारखे काही नाही असे ती नर्स सांगत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. कोणीही खूण दिसू नये , ते टाळण्यासाठी Feviquick चा वापर करण्यात आला आहे, असं तिचं म्हणणं होतं. मात्र यामुळे त्या मुलाचे कुटुंबिय भडकले आणि त्यांनी त्या नर्सची तक्रार केली, तिचा व्हिडीओही अधिकाऱ्यांना दाखवला. यानंतर त्या न्सविरोधात तत्काळ कारवाई करण्यात आली आणि तिला पदावरून निलंबित करण्यात आलं.

राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “फेविक्विक हा एक चिकट पदार्थ आहे, ज्याच्या वैद्यकीय वापरास नियमांनुसार परवानगी नाही. या प्रकरणात, मुलावर उपचार करण्यासाठी Feviquick चा वापर करणाऱ्या बेजबाबदार स्टाफ नर्सला निलंबित करण्यात आले आहे आणि चौकशी सुरू आहे. यापूर्वी परिचारिकेची बदली करण्यात आली होती, त्यामुळे कुटुंबीयांमध्ये नाराजी होती. मात्र अखेर तिला निलंबत करण्यात आलं. दरम्यान ज्या ुलाच्या जखमेवर असा विचित्र उपचार करण्यात आला त्याची प्रकृती आता स्थिर आहे.