‘युद्ध झाले तर पाकिस्तानसोबत,’ भारताच्या आणखी एका शत्रूची घोषणा

सिख्स फॉर जस्टिसचा प्रमुख असलेला पन्नू याने पाकिस्तानला मदत करण्याचा उल्लेख केला यापूर्वी केला होता. त्याने म्हटले होते की, हे 1965 नाही किंवा 1971 नाही... आज 2025 आहे. मी पाकिस्तानी जनतेला सांगू इच्छितो, आम्ही पाकिस्तानसोबत उभे आहोत.

युद्ध झाले तर पाकिस्तानसोबत, भारताच्या आणखी एका शत्रूची घोषणा
भारत-पाकिस्तान तणाव
| Updated on: May 02, 2025 | 7:15 AM

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या तणावाच्या वातावरणामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या आणखी एका शत्रूने धमकी दिली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर आम्ही पाकिस्तानसोबत असणार आहोत, असे खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू याने म्हटले आहे. दोन्ही देशांत युद्ध झाल्यावर ‘इंडियन पंजाब’ पाकिस्तानची साथ देणार असल्याचे पन्नू याने म्हटले आहे. यापूर्वी चीन, तुर्की आणि अजरबैजानने पाकिस्तानला साथ देण्याची घोषणा केली होती.

पाकिस्तानमधील वृत्तपत्र द डॉनने दिलेल्या बातमीनुसार, पन्नू याने एक व्हिडिओ संदेश दिला आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, ‘भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध झाल्यावर हे भारत आणि नरेंद्र मोदी यांचे शेवटचे युद्ध असणार आहे. पंजाब भारताच्या ताब्यातून स्वतंत्र होईल. भारतीय पंजाबी पाकिस्तानी सैन्यासाठी लंगर लावतील. आम्ही भारतीय सैन्याला रोखण्याचे काम करु.’

रिपोर्टनुसार, पन्नूने याने भारताच्या पंजाबमधील कँट भागातील भिंतींवर खडूने संदेश लिहिण्यास सुरुवात केली आहे. त्या संदेशातून शीख सैनिकांना पाकिस्तान विरोधात युद्धात न उतरण्याचे अपील करण्यात आले आहे. त्यापूर्वी त्याच्याकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात ‘पाकिस्तान-खालिस्तान झिंदाबाद’ चा उल्लेख केला आहे. तसेच पंजाबच्या पटियाला भागातील छावनीत खालिस्तानचे झेंडे दिसत आहे.

सिख्स फॉर जस्टिसचा प्रमुख असलेला पन्नू याने पाकिस्तानला मदत करण्याचा उल्लेख केला यापूर्वी केला होता. त्याने म्हटले होते की, हे 1965 नाही किंवा 1971 नाही… आज 2025 आहे. मी पाकिस्तानी जनतेला सांगू इच्छितो, आम्ही पाकिस्तानसोबत उभे आहोत. जगभरात आम्ही पाकिस्तानला साथ देऊ. भारतीय सैन्याला पंजाबमधून पाकिस्तानात आम्ही जाऊ देणार नाही. पाकिस्तान सरकारने खलिस्तानला मान्यता द्यावी, अशी अटही पन्नू याने ठेवली आहे.

पन्नू याने पहलगाम हल्ला हे राजकारण असल्याचे म्हटले आहे. भारताने पाकिस्तानला जगात एकटे पाडण्यासाठी हिंदूंचे हत्याकांड घडवले, असा आरोप त्याने केले आहे.