
भोपाळ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेश भाजपाने 39 उमेदवारांच्या नावाला मंजुरी दिली आहे. यात एक नाव ध्रुव नारायण सिंह यांचं आहे. त्यांना भाजपा भोपाळ मध्य मधून उमेदवारी देणार आहे. ध्रुव नारायण सिंह मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत. 2008 ते 2013 मध्ये ते भोपाळ मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार होते. वर्ष 2013 मध्ये भाजपाने त्यांच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली. आरटीआय कार्यकर्त्या शहला मसूद हत्या प्रकरणात त्यांचं नाव आलं होतं. नंतर या प्रकरणात सीबीआयने त्यांना क्लीन चीट दिली. त्यावेळी गाजलेलं हे शहला मसूद हत्या प्रकरण काय होतं, ते जाणून घेऊया.
16 ऑगस्ट 2011 रोजी घराबाहेर हत्या
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्त्या शहला मसूद यांची त्यांच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. स्थानिक पोलिसांना सुरुवातीला वाटलं की, ही आत्महत्या आहे. पण तपास जस-जसा पुढे सरकला, तस-तशी नवीन धक्कादायक माहिती समोर येत गेली. या प्रकरणात मीडिया आणि जनतेचा दबाव लक्षात घेऊन तत्कालिन राज्य सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केली. 19 ऑगस्ट 2011 रोजी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं.
त्रिकोणी प्रेम कथेतील तीन पात्रं
पात्र नंबर 1 – जाहिदा परवेजच लग्न भोपाळच्या श्रीमंत बोहरा कुटुंबात झालं होतं.
पात्र नंबर 2 – ध्रुव नारायण सिंह हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि बिहारचे माजी राज्यपाल गोविंद नारायण सिंह यांचे पुत्र.
पात्र नंबर 3 – शहला मसूद या इव्हेंट मॅनेजमेंट प्रोफेशनल आणि आरटीआय कार्यकर्त्या होत्या.
डायरीतून धक्कादायक खुलासे
सीबीआयचे तत्कालीन संयुक्त निर्देशक केशव कुमार यांच्या नेतृत्वाखाली 29 फेब्रुवारी 2012 रोजी जाहिदा परवेजच्या कार्यालयावर छापा मारला. एमपी नगरच्या पॉश मार्केटमध्ये आर्किटेक्चर कंपनी चालवणारी जाहिदाला शहला हत्या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून अटक करण्यात आली. त्या छाप्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या. जाहिदाची एक डायरी होती. या डायरीने संपूर्ण केसच सत्य समोर आलं. यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले.
‘त्यानंतर माझ्या मनाला शांती मिळाली’
शहलाची हत्या झाली त्यादिवशी 16 ऑगस्ट 2011 रोजी जाहिदाने तिच्या डायरीत केलेली एक एंट्री मिळाली. “तिच्या घरासमोर तिला गोळी मारण्यात आली. मी सकाळपासून हैराण होते. अलीने 11.15 वाजता फोन केला. तिच्या घरासमोरच काम केलं, म्हणूने त्याने शुभेच्छा दिल्या. तिची खरोखरच हत्या झाली आहे का? हे पडताळण्यासाठी मी माझ्या कर्मचाऱ्याला तिच्या घरी पाठवलं. त्यानंतर माझ्या मनाला शांती मिळाली” असं त्या डायरीत लिहिलं होतं.
असं समोर आलं हे त्रिकोणी प्रेम प्रकरण
जाहिदाच्या कार्यालयात दोन तास तपास अभियान चाललं. त्यावेळी अनेक नाट्यमय आणि घातक प्रेम त्रिकोणाच्या रहस्याचा पर्दाफाश झाला. जाहिदाचे भाजपा आमदार ध्रुव नारायण सिंह यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्याचवेळी ध्रुव नारायण सिंह यांचं शहलासोबत अफेअर चालू होतं. जाहिदाला काहीही करुन शहला तिच्या मार्गात नको होती. तिला संपवायच होतं. म्हणून तिने शहलाच्या हत्येची सुपारी दिली.
वापरलेले कंडोम सापडले
जाहिदाच्या डायरीतून तिचे ध्रुव नारायण सिंह यांच्यासोबत शारीरिक संबंध असल्याच सीबीआयला समजलं. सीबीआयने एक सीडी जप्त केली. त्याशिवाय वापरलेले कंडोमही सापडले. एका प्लास्टिकच्या पिशवीत हे सगळं होतं. सीबीआय कार्यालयातील चौकशीत जहिदाने तिचा गुन्हा कबूल केला. या प्रकरणामुळे ध्रुव नारायण सिंह यांना भाजपा उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.