दोघेही श्रीमंत-संपन्न घरातले, लग्नानंतर फक्त पाच दिवस सोबत राहिले, सर्वांच्या मनात मेघा-सिद्धार्थ मागे फक्त एकच प्रश्न सोडून गेले
सात जन्म हाच जोडीदार मिळावा अशी लग्नामागची एक भावना असते. मेघा आणि सिद्धार्थ या दोघांनी सुद्धा याच भावनेने लग्न केलं होतं. पण सात जन्म सोबत राहण्याचा संकल्प अवघ्या 28 दिवसात संपला.

लग्न हे खूप पवित्र बंधन आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. पुढचे सात जन्म हाच जोडीदार मिळावा अशी लग्नामागची एक भावना असते. मेघा आणि सिद्धार्थ या दोघांनी सुद्धा याच भावनेने लग्न केलं होतं. पण सात जन्म सोबत राहण्याचा संकल्प अवघ्या 28 दिवसात संपला. 25 एप्रिलला दोघांचं मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं. एक मे रोजी मेघा आपल्या माहेरी गेली. त्यावेळी सिद्धार्थला असं अजिबात वाटलं नव्हतं की, आपली भेट पुन्हा होणार नाही. माहेरी गेलेल्या मेघाने 20 मे रोजी स्वत:च जीवन संपवून घेतलं. आपल्या जोडीदाराचं असं अचानक निघून जाणं सिद्धार्थला अजिबात सहन झालं नाही. अवघ्या दोन दिवसात 22 मे रोजी त्याने सुद्धा स्वत: जीवन संपवून घेतलं. सिद्धार्थचा मृतदेह घरात बाथरुममध्ये मिळाला. विवाहानंतर अवघ्या 28 दिवसात मेघा-सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला. पण मेघाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
हुरावली लिंक रोडवर राहणाऱ्या 23 वर्षीय मेघाचं 25 एप्रिलला सिद्धार्थ कांदिल (26) सोबत लग्न झालं होतं. तो पिंटो पार्क कुंज विहार कॉलोनी फेस-1 मध्ये रहायचा. खूप धूमधडाक्यात दोघांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. मेघाच्या वडिलांनी गुरुवीर सिंह यांनी मुलीच्या लग्नात भरपूर खर्च केला. लग्नानंतर मेघा सुद्धा आनंदात होती. 1 मे रोजी ती सासरहून माहेरी आली. ती खुश होती. 20 मे रोजी मेघाचे वडिल एका नातेवाईकाकडे लग्नाला गेले होते. घरी मेघा आणि तिची आई होती.
आई गीतासाठी हा मोठा धक्का
दुपारच्यावेळी आई घरातल्या पहिल्या मजल्यावर गेली. त्यावेळी मेघाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिला. आई गीतासाठी हा मोठा धक्का होता. तिने हंबरडा फोडला. माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीय लगेच मेघाला रुग्णालयात घेऊन गेले. पण तो पर्यंत उशिर झालेला. मेघाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. तिचा मृतदेह सरणावर असताना हातावरच्या मेहदीची चमकही तशीच होती.
दोघांनी असं का केलं?
मेघाने असं अचानक इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने सासरी आणि माहेरी दोघांना मोठा धक्का बसला. दोन्हीकडचे लोक दु:खात असताना शुक्रवारी 22 मे रोजी पिंटो पार्क येथील घरात मेघाचा पती सिद्धार्थने जीवन संपवलं. सिद्धार्थने पेशाने कंत्राटदार होता. मेघाचा मृत्यू झाल्यापासून तो शांत, गप्प-गप्प होता. कोणाशी काही बोलत नव्हता. वडिल परमाल सिंह यांना सिद्धार्थ बेडवर दिसला नाही. ते शोधत शोधत बाथरुमकडे गेले. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. भाचा श्यामवीरने दरवाजा तोडला, तेव्हा सिद्धार्थ मृतावस्थेत दिसला. पोलिस घटनास्थळी आले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दोघांनी असं का केलं? त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.