
गेल्या आठवड्यात ( गुरूवार 12 जून) अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने सगळेच हादरलेत, 270 हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला असून त्याची दहशत अद्याप लोकांच्या मनात असतानाच, काल लखनऊ एअरपोर्टवरही (Lucknow Airport एक मोठा अपघात टळला. खरंतर, सौदी अरेबियातील जेद्दाह येथून येणाऱ्या SV 3112 या विमानाचं लँडिंग होत असतानात, अचानक विमानाच्या चाकांमधून ठिणग्या उडाल्या तसेच धूरही येऊ लागला. या विमानात सुमारे 250 हज यात्रेकरू होते. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सकाळी 6:30 च्या सुमारास लखनौला पोहोचले. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवर उतरताच त्याच्या एका चाकातून ठिणग्या निघताना दिसल्या. विमानतळ कर्मचाऱ्यांनी तात्काळ सतर्कता दाखवली आणि आपत्कालीन प्रक्रियेचे पालन करून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. पण प्रवाशांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा प्रचंड घबराट उडाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानाला टॅक्सीवेवर परत ढकलण्यात आले. प्रवाशांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
अहमदाबादमधील विमान दुर्घटना
गेल्या आठवड्यात, गुरुवार (12 जून, 2025) अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला प्रचंड मोठा अपघात झाला. टेकऑफ करताच अवघ्या काही क्षणांतच हे विमान अहमदाबादमधील एका मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कोसळले.
या विमानात 242 प्रवासी होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामधून अवघा 1 प्रवासी जिवंत वाचला, मात्र तो बराच जखमी होता, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा अपघात फक्त विमानापुरता मर्यादित नव्हता. ते विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या परिसरात कोसळले, तेथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांनाही त्याचा फटका बसला, ज्यामुळे एकूण मृतांची संख्या 270 पेक्षा जास्त झाली आहे.
हा अपघात भारताच्या विमान वाहतूक इतिहासातील सर्वात दुःखद आणि भयानक घटनांपैकी एक मानला जातो. सरकारी संस्थांनी चौकशी सुरू केली आहे आणि प्राथमिक अहवालांनुसार, तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. या अपघातामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. या अपघातात ज्या प्रवाशांनी आपला जीव गमावला त्यांच्या अतिशय हृदयद्रावक कहाण्या सध्या समोर येत आहेत.